कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या लाडक्या बाप्पांचे घरच्या घरीच विसर्जन करण्याची संकल्पना टीम गणेशाच्या माध्यमातून (कोल्हापूर गणेशोत्सव २०२०) मी मांडली होती. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या संकल्पनेनुसार सुमारे चार हजार गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन झाले असल्याची माहिती टीम गणेशाचे समन्वयक प्रशांत मंडलिक यांनी दिली.
अमोनियम बायकार्बोनेट (बेकरी उत्पादनांमध्ये वापरला जाणारा खायचा सोडा) वापरून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींच्या पर्यावरणपूरक विसर्जनाबाबत आम्ही नागरिकांमध्ये जनजागृती केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
मूर्तिकारांनीदेखील त्यांच्या स्टॉलबाहेर या संकल्पनेची माहिती देणारे फलक लावले होते. राज्यभरातील अनेक नागरिकांनी माझ्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या संकल्पनेची माहिती जाणून घेतली.
कोल्हापूर शहर, कळंबा, पाचगाव, आर. के.नगर, कसबा बावडा, दिंडनेर्ली, कागल, इचलकरंजी, सांगली, मिरज, आदी परिसरांतील सुमारे चार हजार गणेशमूर्तींचे आम्ही मांडलेल्या संकल्पनेनुसार विसर्जन करण्यात आले. अशा पद्धतीने विसर्जन करण्यासाठी कोल्हापुरातून सुमारे चार टन अमोनियम बायकार्बोनेटची विक्री झाल्याचे प्रशांत मंडलिक यांनी सांगितले.