कोल्हापूर:कोल्हापूर शहरात गेली दहा दिवस सध्या पद्धतीने सुरु असलेल्या गणेशोत्सवाची सांगता रविवारी 'श्री'च्या विसर्जनाने होत आहे. सकाळपासून मंडळाचे कार्यकर्ते आपल्या गणेश मूर्ती रंकाळा तलावाच्या शेजारी असलेल्या इराणी खाणीकडे विसर्जनासाठी नेऊ लागले आहेत.
दरम्यान, येथील मध्यवर्ती शिवाजी चौकातील 21 फुटी गणेश मूर्ती विसर्जनासाठी आणल्या मुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुळात चार फुटच्या वर उंची असलेली मूर्ती बसविण्यास प्रशासनाने परवानगी नाकारली आहे, तरी ती शिवाजी चौक मंडळाने बसवली, आता तर ती विसर्जनासाठी रस्त्यावर आणल्यामुळे मंडळ विरुद्ध प्रशासन असा वाद तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चौकात प्रचंड पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तेथे काहीसा तणाव सुद्धा दिसत आहे. पोलिसांनी मिरणुकीस अद्याप परवानगी दिलेली नाही.
कोल्हापुरातील मानाच्या तुकाराम माळी तालामीच्या गणेशाचे सध्या पद्धतीने मंडळाच्या दरातच विसर्जन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे विजय देवणे उपस्थित होते. शिवाजी पोवार, किरण अतिगरे यांनी स्वागत केले.
यावर्षी पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जनास बंदी असल्यामुळे इराणी खाणीत विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. तेथे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेसह मूर्ती विसर्जना करीत महापालिकेने सर्व यंत्रणा उभी केली आहे.