कोल्हापूर : ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्यावर्षी लवकर या..’च्या गजरात गेल्या पाच दिवसांपासून भक्तांच्या घरी पाहुणचार घेतलेल्या गणपती बाप्पांना मंगळवारी निरोप देत कोल्हापूरकरांनी गणेशमूर्ती विसर्जनाचा पर्यावरणोत्सव साजरा केला. पंचगंगा नदीसह रंकाळा तलाव व शहर-जिल्ह्यातील कोणत्याच जलाशयात एकही गणेशमूर्ती विसर्जित झाली नाही. जिल्हा व महापालिका प्रशासनाने केलेल्या आवाहनाला आणि नियोजनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पाच लाखांवर गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन व २०० टन निर्माल्य दान झाले. गावोगावी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन विसर्जनाची व्यवस्था केली त्यामुळे नदीचे प्रदूषण रोखण्यात यश आले.
राजर्षी शाहू महाराज आणि पुरोगामी चळवळीचा वारसा लाभलेल्या कोल्हापुरात पारंपरिक सण-उत्सवही बदलत्या काळानुसार साजरे केले जातात. गेल्या काही वर्षात गणेशमूर्तींचे काहिलीत पर्यावरणपूरक विसर्जन केले जाते. त्यात गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिका व जिल्हा प्रशासनाने नदी-तलाव या जलाशयांच्या ठिकाणी विसर्जनावर बंदीच आणली. पर्यायी व्यवस्था म्हणून शहरातील चाैकाचौकात भागाभागात काहिलींची व्यवस्था करण्यात आली. शेवटच्या आरतीसाठी मांडव, टेबलची सोय आणि मूर्ती विसर्जनासाठी काहिलीला पडदे फुलांच्या माळांना सजवण्यात आले होते.
दुपारी ४ नंतर घराघरात श्रीगणेशाची शेवटची आरती करण्यात आली. गणपती बाप्पा मोरयाचा गजर आणि चिरमुऱ्याची उधळण करत जवळच्या काहिलीत गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. महापालिकेकडून या विसर्जित मूर्ती पुन्हा इराणी खाणीत विसर्जित करण्यात आल्या. हे काम मध्यरात्रीपर्यंत चालले, तर निर्माल्य एकटी संस्थेच्या खतनिर्मिती प्रकल्पासाठी नेण्यात आले.
----
दारातच विसर्जन
गेल्या काही वर्षात भाविकांकडून शाडू तसेच मातीच्या गणेशमूर्तींना अधिक मागणी आहे. अनेक भाविकांनी दारातच मोठा टब, पातेल्याची सुंदर सजावट केली. त्यात फुलांच्या पाकळ्या घालून यात गणेशमूर्ती विसर्जित केली. मूर्ती विरघळल्यानंतर हेच पाणी व माती झाडांना घालण्यात आले.
---
गंगावेश ते पंचगंगा घाट रस्त्यावर जत्रा
पंचगंगेचे पाणी सध्या पात्राबाहेर आले आहे. शिवाय पोलिसांची घाटाभोवती बॅरिकेडिंग केले आहे. त्यामुळे नदीत एकही मूर्ती विसर्जित झाली नाही. पण गंगावेश चौक ते पंचगंगा घाट या रस्त्यावर ठिकठिकाणी महापालिकेने काहिलींची सोय केल्याने या रस्त्याला यात्रेचे स्वरूप आले होते. येथेच खाद्यपदार्थ, खेळणीचे स्टॉल मांडण्यात आले होते.
---
मंडळे, संस्था सरसावल्या..
पर्यावरणपूरक विसर्जनासाठी शहर-उपनगरातील गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था सरसावल्या होत्या. चौकाचौकात व ठरावीक अंतरावर विसर्जन कुंड, काहिली ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्या त्या भागातील नागरिकांची मोठी सोय झाली तसेच गर्दी विखुरली गेली.
--
चळवळ यशस्वी
पर्यावरणपूरक विसर्जनासाठी महापालिका प्रशासनाने काटेकोर नियोजन केले. जलाशयात विसर्जन करायचे नाही असे म्हणताना त्याला उत्तम पर्यायही दिला. १६० विसर्जन कुंड, मूर्ती नेण्यासाठी ट्रॅक्टर, ट्रॉली, त्यांचे पुन्हा इराणी खाणीत विसर्जन, निर्माल्य नेण्याची वेगळी सोय, सफाई कर्मचारी अशी चोख व्यवस्था होती. चांगल्या उद्देशासाठी केलेली पर्यायी व्यवस्था उत्तम असेल तर नागरिक स्वयंस्फूर्तीने त्यात सक्रिय सहभाग घेतात आणि ती चळवळ यशस्वी करतात हा कोल्हापूरचा आजवरचा अनुभव आहे.
---
पोलिसांना मोफत जेवण
श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीने शहरात बंदोबस्तावर असलेल्या तीनशे पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणाची पाकिटे देण्यात आली. यामध्ये मसालेभात, चपाती, कुर्मा या पदार्थांचा समावेश होता. ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी ही पाकिटे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्याकडे सुपुर्द केली.
--
महापालिका इच्छुकांकडून ब्रॅण्डिंग
महापालिका निवडणूक तोंडावर असल्याने अनेक इच्छुकांनी गणेश विसर्जनाच्या निमित्ताने स्वत:चे ब्रॅण्डिंग केले. भागात विसर्जन कुंड, मांडव, भाविकांना प्रसादाची सोय करण्यात आली होती. प्रभाग क्रमांकापासून ते केलेली कामे, पुढील जाहीरनामा, मोठे फोटो असलेले डिजिटल भाविकांचे लक्ष वेधून घेत होते.
--
फोटो फाईल स्वतंत्र आहे.