प्रयाग चिखली : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या अस्थीचे विसर्जन तीर्थक्षेत्र प्रयाग येथील पंचगंगा संगमावर त्यांचे पुत्र जेष्ठ अभिनेते अजिंक्य देव व बंधू अभिनय देव यांनी केले. वडिल रमेश देव यांची शेवटची इच्छा म्हणून अजिंक्य देव व देव कुटुंबीय मुंबईहून कोल्हापूरला अस्थी कलश घेऊन तीर्थक्षेत्र प्रयाग संगमावर आले होते.
महालक्ष्मीचे दर्शन घ्यावे, ज्या कोल्हापूरच्या मातीत जन्मलो, खेळलो, वाढलो. बालपणी ज्या पंचगंगेच्या पाण्यामध्ये डुंबलो, पंचगंगेच्या पुराच्या पाण्यामध्ये उड्या मारल्या, त्या पंचगंगेमध्ये आपल्या अस्थी विसर्जित व्हाव्यात अशी अभिनेते रमेश देव यांची इच्छा होती. म्हणून त्यांच्या अस्थी प्रयाग येथील पंचगंगेच्या संगमावर विसर्जित करण्यासाठी आम्ही मुंबईहून आलो, असे अजिंक्य देव यांनी सांगितले.यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आरती देव, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त देखील उपस्थित होते. यावेळी नगरसेवक राजू दिंडोर्ले, प्रसाद पाटील, अभिजित पाटील, नीलेश लाड, अमित पाटील, राजू पाटील, सुनील तुपे, सागर साळोखे, रणजीत वरेकर उपस्थित होते.
लता मंगेशकर यांना श्रद्धांजली
अजिंक्य देव व अभिनय देव यांच्यासह ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी लता मंगेशकर यांनाही श्रद्धांजली वाहिली. लता दीदींच्या जाण्याने सिनेसृष्टीत फार मोठी पोकळी निर्माण झाली, असे अजिंक्य देव म्हणाले. यावेळी राजदत्त म्हणाले, लतादीदींचा जीवनपट, त्यांचे गुण सर्वांना माहीत आहेत. पण त्यांच्या देशभक्तीबद्दल मात्र फारसे बोलले जात नाही. गोवा मुक्तिसंग्रामामध्ये त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे.