सातारा : गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर याह्ण अशी साद घालत गुरुवारी सातारा शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मानाच्या व शेवटच्या शंकर-पार्वती गणेशमूर्तीचे सकाळी विसर्जन केल्यानंतर साताऱ्याचा मिरवणूक सोहळा संपन्न झाला. हा सोहळा तब्बल तेरा तास रंगला.सातारा पालिकेच्या वतीने बुधवार नाक्यावर उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावासह जलतरण तलाव, हुतात्मा स्मारक, दगडी शाळा व कल्याणी शाळा येथील तळ्यात मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. गुरुवारी सकाळपासूनच घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचा विसर्जन सोहळा सुरू झाला.
अनेकांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पांची मिरवणूक काढली. सायंकाळी चार वाजता मुख्य विसर्जन मिरवणूक सोहळा सुरू झाला. राजवाड्यावरून सुरू झालेली मिरवणूक मोती चौक, देवी चौक, शेटे चौक, सम्राट चौक, प्रतापगंज पेठ मार्गे बुधवार नाक्यावरील विसर्जन तळ्याकडे मार्गस्थ झाली.गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत भाविकांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. पालिकेच्या वतीने कृत्रिम तळ्यावर विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था केली होती. विसर्जन मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या व्यतिरिक्त ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले होते. त्यामुळे मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.