विद्यापीठातील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे अधिविभाग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील वर्ग प्रत्यक्षात (ऑफलाईन) सोमवार (दि. १५) पासून सुरू झाले. पहिल्या दिवशी बहुतांश महाविद्यालयांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ६५ टक्क्यांहून अधिक राहिली. ऑफलाईन वर्गांची सुरुवात असल्याने प्राचार्य, प्राध्यापकांनी यापुढील त्यांच्या उपस्थितीबाबतचे हजेरी क्रमांकानुसार नियोजन करून त्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यानुसार मंगळवारपासून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी उपस्थित राहिले. एक दिवसआड उपस्थित राहण्याबाबत त्यांचे नियोजन महाविद्यालयांनी केले आहे. विद्यापीठातील अधिविभागांमध्ये सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत. हे विद्यार्थी विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये राहतात. वसतिगृहे अद्याप सुरू झाली नसल्याने ते सध्या आपापल्या गावी आहेत. त्यामुळे ऑफलाईन वर्गांना उपस्थित राहायचे आहे. त्यासाठी वसतिगृहे लवकर सुरू व्हावीत, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.
चौकट
परीक्षा अर्ज भरण्याची घाई
विद्यापीठाकडून विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा साधारणत: मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून घेण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सध्या महाविद्यालय पातळीवर सुरू आहे. अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांची महाविद्यालयात गर्दी होत आहे. ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी त्यांची घाई सुरू आहे.
प्रतिक्रिया
ऑफलाईन वर्गांना विद्यार्थ्यांच्या चांगला प्रतिसाद आहे. वर्गातील विद्यार्थ्यांच्या ५० टक्के उपस्थितीबाबतच्या शासन नियमानुसार आम्ही नियोजन करून त्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे.
-प्रा. टी. के. सरगर, उपप्राचार्य, न्यू कॉलेज.
जिल्ह्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात
विद्यापीठातील अधिविभाग : ३९
महाविद्यालये : १२१