कोल्हापूर : कोरोना काळात काम केलेल्या कोवीड योद्धांना आश्वासन दिल्याप्रमाणे सेवेत कायम करा, तात्पुरत्या नियुक्त केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे आदी मागण्यासाठी सोमवारी वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन केले.
सीपीआर परिसरात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तीव्र निदर्शने केली. दिवसभर काम बंद आंदोलनामुळे सीपीआरमधील वैद्यकीय सेवा काहीकाळ कोलमडल्याचे दिसले. प्रत्येक विभागात रुग्णांची गर्दी होती.वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत कायम करून घेण्याच्या मागणीसाठी वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी एक दिवसांचे काम बंद आंदोलन केले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिवसभरात वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या कार्यालयासमोर मागण्यांचे शासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. आंदोलनात डॉ. गिरीश कांबळे, डॉ. विकास जाधव, डॉ. विजय गाडवे, डॉ. व्यंकटेश पोवार, डॉ. जहिर पटवेकर, डॉ. अनिकेत पाटील, डॉ. नवज्योत देसाई, डॉ. संदेश आडमुठे, डॉ. आसमा मुल्ला, डॉ. शीतल हारुगडे, डॉ. मनाली माने, डॉ. प्रांजली व्हटकर आदींचा समावेश होता.