कोल्हापूर : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सुरू असलेल्या शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संपात सीपीआरमधील सुमारे ७० टक्के कर्मचारी सहभागी आहेत. सीपीआरमधील आरोग्य यंत्रणेवर याचा परिणाम झाला असून, काही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. अत्यावश्यक कामांसाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली आहे.सीपीआरमधील ६४२ पैकी ३८४ कर्मचारी संपात सहभागी आहेत. कंत्राटी कर्मचारी, मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने अत्यावश्यक आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम सीपीआरमधील डॉक्टरांकडून सुरू आहे. रोज सरासरी ३५० ते ४०० रुग्ण उपचारासाठी सीपीआरमध्ये येतात. मंगळवारपासून कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाल्याने रुग्णांची संख्या घटल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, अपघात विभाग आणि प्रसूती विभागातील रुग्णांचा ओघ नेहमीप्रमाणेच सुरू आहे.सीपीआरमधील अत्यावश्यक सुविधा सुरू राहाव्यात यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह खासगी आणि शासकीय नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे. तसेच व्हाइट आर्मीचे जवानही सीपीआरमधील आरोग्य यंत्रणेच्या मदतीला धावले आहेत. रुग्णवाहिकांमधून रुग्णांना उतरवून घेण्यापासून ते केसपेपर लिहिण्याचेही काम व्हाइट आर्मीचे जवान करीत आहेत.
कंत्राटी कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारीही डॉक्टरांच्या मदतीला सज्ज असल्याने अत्यावश्यक रुग्णसेवा सुरू आहे. विविध प्रयोगशाळांमधील तंत्रज्ञ आणि कर्मचारी संपात सहभागी असल्यामुळे रुग्णसेवेवर याचा परिणाम जाणवत आहे.काही शस्त्रक्रिया पुढे ढकलल्याखासगी डॉक्टर आणि तंत्रज्ञांच्या मदतीने काही अत्यावश्यक शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. मात्र, बहुतांश शस्त्रक्रिया लांबणीवर टाकल्याची माहिती सीपीआरमधील डॉक्टरांनी दिली.
डॉक्टर उपस्थित असले तरी अनेक कर्मचारी, तंत्रज्ञांचा संपात सहभाग आहे. त्यामुळे सीपीआरमधील रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने आमचे काम सुरू आहे. -डॉ. प्रदीप दीक्षित - अधिष्ठाता, सीपीआर