कोल्हापूर : कोरोनामुळे गेली दीड वर्ष घरात बसून असलेल्या गतिमंद, मतिमंद अशा दिव्यांग मुलांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, एरवी आपल्यासारख्या मुला-मुलींसोबत शिक्षकांसोबत वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये गुंतून राहिलेल्या या मुलांना अचानक चार भिंतीत बंदिस्त व्हावे लागल्याने त्यांना शारीरिक आणि मानसिक आजारांना सामोरे जावे लागत आहे.
कोरोना संसर्गाने माणसाच्या शरीरावर, प्रतिकारक्षमतेवर हल्ला होत असताना दुसरीकडे लॉकडाऊन आणि बंदिस्त जगण्याच्या सक्तीने मनोविश्वावरही मोठा आघात झाला आहे. भोवतालच्या भीतीदायक आणि अस्थिर वातावरणामुळे सर्वसामान्य माणसांनाही जिथे डिप्रेशन आणि नैराश्याचा सामना करावा लागत आहे तिथे गतिमंद, मतिमंद, सेरेब्रल पाल्सी अशा दिव्यांग मुलांच्या मानसिकतेवरही मोठा परिणाम झाला आहे.
एरवी ही मुलं दिव्यांग विशेष शाळेत शिक्षण घेतात, सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत व्यायाम, प्रार्थना, पाठ्यक्रम आणि लहान मोठे उद्योग, फाईल, गणपती बनवणे, फ्लॉवरपॉटमधील फुले बनवणे अशा कामात गुंतून राहतात. भोवतालची मुलंही त्यांच्यासारखीच असल्याने न्यूनगंड येत नाही, त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यही चांगले राहते. दुसरीकडे पालकांना नोकरी, व्यवसाय कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी वेळ मिळतो.
सुरक्षिततेच्या कारणास्तव गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. याचा मोठा परिणाम दिव्यांग मुलांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेवर झाला आहे. अचानक घरात बंदिस्त राहावे लागले आहे, व्यायाम बंद असल्याने शारिरीक व्याधी व तक्रारींनी डोके वर काढले आहे. तर गुंतून राहण्याचे कोणतेच साधन नसल्याने मानसिक संतुलनही ढासळत आहेत.
---
पालकांनाही सावरणे कठीण
दिव्यांग मुलांना सांभाळण्याचा शिक्षकांना चांगला अनुभव असतो. घरात मात्र अनेकदा ही मुले आक्रमक होतात. अशावेळी त्यांना सावरणे कुटुंबीयांनाही शक्य होत नाही. त्यामुळे मुलांवर कितीही प्रेम असले तरी पालकांचीही चिडचीड होते, काहीवेळा हात उगारला जातो.
---
गणपती रंगवण्याचे काम
ही अडचण ओळखून इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित स्वयंम शाळेने आता या मुलांना कुंभारांकडून न रंगवलेल्या गणेशमूर्ती आणून त्या विद्यार्थ्यांच्या घरी पोहोच करायला सुरुवात केली आहे. या रंगकामात आता मुलं व्यस्त राहत आहे. चेतना संस्थेच्यावतीनेदेखील या कालावधीत मुलांचे समुपदेशन करणे, त्यांना घरीच वेगवेगळ्या कामात व्यस्त ठेवणे असे उपक्रम घेण्यात आले.
---
शाळा-शिक्षकांचे मोलाचे सहकार्य
अनेक पालकांकडून मुलांबद्दलच्या तक्रारी येऊन तुम्ही काही मदत करा अशी विचारणा होत आहे अशा मुलांना शाळेचे शिक्षक मोबाईल, व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधतात आणि त्यांचे समुपदेशन करतात.
-
घरी बसल्यामुळे शाळेतील मोठ्या मुलांना शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यांनी गुंतून राहावे यासाठी समुपदेशनासह वेगवेगळे उपक्रम घेत आहोत, एरवी आमची मुलं शाळेत गणेशमूर्ती तयार करतात पण आता आम्ही त्यांच्याकडून मूर्ती रंगवून घेवून त्यांना या कामाचे बक्षीसही देणार आहाेत.
अमरदीप पाटील (व्हाईस चेअरमन, इंडियन रेडक्रॉस सोसायटी)
--
गेल्या दीड वर्षात शिक्षक मुलांची भेट होत नाहीय त्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. मुलांना सावरणे शक्य नसेल तर शाळेत एखादा फेरफटका मारून आणला जातो त्यामुळे ते पुन्हा शांत होतात. मुलांचे लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय शाळा सुरू करता येणे शक्य नाही पण कायम आम्ही त्यांच्या संपर्कात असतो.
पवन खेबूडकर (कार्यकारी अध्यक्ष, चेतना विकास मंदिर)
--
जिल्ह्यात साडेपाचशेच्या वर विद्यार्थी
कोल्हापूर शहरातील तीन आणि इचलकरंजी, वारणानगर, अंबप, गडहिंग्लज, कागल अशा सातच्या आसपास शाळा असून येथे साडेपाचशेच्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
--
फोटो नं ०९०७२०२१-कोल-स्वयंम स्कूल
ओळ : कोल्हापुरातील स्वयंम शाळेच्यावतीने विद्यार्थांच्या घरी रंगकामासाठी गणेशमूर्ती देण्यात आल्या आहेत, शुक्रवारी हा विद्यार्थी मूर्ती रंगवण्यात व्यस्त होता. (छाया- आदित्य वेल्हाळ)
--