कोल्हापूर : डाव्या बाजूने उघडणारा दरवाजा, लेफ्ट हॅन्डेड ड्रायव्हर अशी वैशिष्ट्य असलेल्या १९५७ मधील शेवरलेट कंपनीची इम्पाला, रशियन ट्रॅक्टर, प्रिमियर पद्मिनी, जीप, मारुती सुझूकीच्या क्लासिक आणि व्हिन्टेज गाड्या पाहण्यासाठी तरुणाईने कोल्हापुरातील महावीर महाविद्यालयाचे आवारात गर्दी केली होती. पहिल्याच वर्षी भरवण्यात आलेल्या या वाहन प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.महावीर महाविद्यालयात बी व्होक ऑटोमाेबाईल विभागाच्या चौथ्या बॅचने आयोजित केलेल्या ऑटोमेनिया २०२४ या तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी घाटगे उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक तेज घाटगे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. के. ए. कापसे होते. यावेळी प्रा. सूरज शिंदे, प्रा. उत्कर्ष पाटणकर, प्रा. अमिन सदलगे, कोल्हापूर व्हिंटेज ओनर्स क्लबचे शंतनू जाधव, विक्रम जाधव, तेज बाईक्सचे तेजराज पाटील, रोहित इंगळे उपस्थित होते. जावेद मिस्त्री यांनी सूत्रसंचालन केले.या प्रदर्शनात व्हिंटेज गाड्यांचा संग्रह असणाऱ्या पाच क्लबचा समावेश होता. याशिवाय चारचाकी विक्रीचे ८, दुचाकी विक्रीचे ९ स्टॉल्स या प्रदर्शनात आहेत. याशिवाय बॅटरी ऑपरेटेड सायकल आणि व्हिंटेज तिचाकीसह १० सायकल्स, १० चारचाकी, ४० दुचाकीचा समावेश आहे.रशियन ट्रॅक्टर, इम्पाला गाडीचे विशेष आकर्षणया प्रदर्शनात रशियन शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या रशियन ट्रॅक्टर विशेष आकर्षण ठरले. याशिवाय तेज घाटगे यांची इम्पाला गाडी, अम्बॅसिडर गाडीभोवती तरुणांचा गराडा पडला होता. यातील अनेक जुन्या गाड्या खराब झाल्यानंतर त्याची दुरुस्ती करुन मॉडिफाईड आणि रिस्टोअर करुन पुन्हा चालू करण्याची किमया व्हिंटेज ओनर्स क्लबच्या मेस्त्रींनी केली आहे.
इम्पाला, रशियन ट्रॅक्टर, प्रिमियर पद्मिनी; व्हिन्टेज गाड्या पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची मोठी गर्दी
By संदीप आडनाईक | Published: February 03, 2024 6:21 PM