लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : बाजार समित्यांनी कामकाज करताना शेतकरी केंद्रबिंदू मानून कामकाज करून त्यांना जास्तीत जास्त सुविधा द्या. शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रत्येक बाजार समितीने पणन मंडळाची शेतमाल तारण कर्ज योजना प्राधान्याने राबवावी, अशी सूचना विभागीय सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी दिल्या.
कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या सचिवांची आढावा बैठक सांगली बाजार समितीच्या सभागृहात झाली. त्यामध्ये ते बोलत होते.
बाजार समितीचे ई-नाम अंमलबजावणीबाबत नाराजी व्यक्त करत श्रीकृष्ण वाडेकर म्हणाले, ई-लिलाव अणि ई-पेमेंट चालू करा, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या गोदाम अणि धान्य चाळणी प्रकल्पाची कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत, केंद्र सरकारच्या किसान आत्मनिर्भर योजनेमध्ये नोंदणी करून प्रसार बाजार समितीने करावा.
कराडचे उपनिबंधक मनोहर माळी, पणनचे कोल्हापूर विभागाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले, सहायक निबंधक राजमाने, विभागातील बाजार समित्यांचे सचिव उपस्थित होते.
फोटो ओळी : कोल्हापूर विभागातील बाजार समित्यांच्या सचिवांची सांगली बाजार समितीमध्ये आढावा बैठक झाली. (फाेटो-१२०२२०२१-कोल- बाजार समिती)