कोल्हापूर : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य शासनाच्या विविध आवास योजनांना गती देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये महाआवास अभियान राबवण्यास सुरुवात झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत गतवर्षी राज्यात ३३ व्या क्रमांकावर असलेला कोल्हापूर जिल्हा केवळ एका वर्षात चौथ्या क्रमांकावर आला आहे.
शासनाच्या विविध योजना एकत्रित करून त्यांचा लाभ देण्याचा उद्देश या महाअभियानातून साध्य करण्यात येणार आहे. रोजगार हमी योजनेमधून रोजगार व स्वच्छ भारत मिशनमधून शौचालय देणे, जलजीवन मिशनमधून विद्युत जोडणी देणे, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानातून उपजीविकेचे साधन देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
नावीन्यपूर्ण उपक्रम
१ पुरेशी जागा नसल्यास बहुमजली इमारती बांधणे.
२ पुरेशी जागा असल्यास गृहसंकुल उभारून त्यांची सहकारी संस्था स्थापणे.
३ घरकुल बांधकामासाठी बँकेचे ७० लाख रुपये कर्जस्वरूपात मिळवून देणे.
४ घरकुलांचे बांधकाम साहित्य उपलब्ध करण्यासाठी घरकुल मार्ट सुरू करून त्यात महिला बचत गटांचा सहभाग घेणे.
५ पंचायत राज संस्था, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, कॉर्पोरेट संस्था, लाभार्थी व लोक सहभाग यांच्या माध्यमातून मूलभूत सुविधा देऊन आदर्श घरांची निर्मिती करणे.
चौकट
शुक्रवारी जिल्हास्तरीय कार्यशाळा
या महाअभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शुक्रवारी ( दि. १८) सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद सदस्य, गटविकास अधिकारी, अन्य पदाधिकारी यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह आमदारांची यावेळी उपस्थिती राहणार आहे.
चौकट
कोरोना काळातही प्रगतिपथावर
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास यांनी कोरोनाच्या काळात उत्तम नियोजन करून कोल्हापूर जिल्हा राज्यात थेट चौथ्या क्रमांकावर आणला. शिवदास यांच्याकडे एकीकडे शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेतील समन्वयाची जबाबदारी असतानाही त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी विशेष नियोजन केल्यामुळे जिल्ह्याचा राज्यात वरचा क्रमांक लागला आहे.