निपाणी : कर्नाटक शासनाने मिनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर गुरुवारी सायंकाळपासून निपाणी तालुक्यात याची अंमलबजावणी सुरू झाली. यानंतर पोलिसांनी तात्काळ निपाणी शहरातील सर्व आस्थापना बंद करण्याचा आदेश दिला. यामुळे शुक्रवारी कोणकोणती दुकाने उघडणार याबद्दल नागरिकांमध्ये साशंकता होती; पण शुक्रवारीही बहुतांशी दुकाने बंद राहिल्याने निपाणीत मिनी लॉकडाऊनला प्रारंभ झाला आहे. यानंतर आज शनिवार व रविवार दोन दिवस कडक लॉकडाऊन होणार आहे.
कर्नाटक राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, परिस्थिती धोक्याची बनली आहे. यामुळे कर्नाटक शासनाने नाइट कर्फ्यू व आठवड्यातून दोन दिवस शनिवार व रविवार लॉकडाऊनची घोषणा केली होती; पण यानंतर गुरुवारी रात्री राज्याच्या मुख्य सचिवांनी सोमवार ते शुक्रवारही अत्यावश्यक सेवा वगळून सर्व आस्थापना बंद ठेवण्याचा आदेश जारी केला होता; पण शुक्रवारी नेहमीप्रमाणे व्यवहार सुरळीत सुरू होते. दुपारनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देताच पोलिसांनी सर्व आस्थापना बंद करण्याचा आदेश दिला. अत्यावश्यक सेवा वगळून निपाणीतील सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या. निपाणी शहरात सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचे रुग्ण अधिक नसले तरी काळजी म्हणून प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. निपाणी शहराला लसीचा तुटवडा नसून, ऑक्सिजन बेडचीही सोय होणार असल्याची माहिती मंत्री शशिकला जोल्ले यांनी नगरपालिकेत झालेल्या बैठकीत दिली होती.