कोल्हापूर : वादग्रस्त कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे काम आव्हानात्मक आहे. गेल्या वर्षभरापासून येथील शिस्त विस्कटली आहे. आपल्या काळात कोणत्याही चुकीच्या गोष्टींना थारा दिला जाणार नाही, शिस्त आणि सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार असल्याचे नवे अधीक्षक दत्तात्रय गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.गावडे यांनी कारागृह विभागात २७ वर्षे सेवा केली आहे. १९९२ साली ते नोकरीत रुजू झाले. मुंबई, पुणे, येरवडा, अहमदनगर या ठिकाणी त्यांनी सेवा बजावली आहे. २००९ ते २०१० या कालावधीत त्यांनी कळंबा कारागृहात तुरुंगाधिकारी म्हणून काम केले आहे.
सातारा जिल्ह्यातील बरड (ता. फलटण) हे त्यांचे गाव आहे. शरद शेळके यांच्याकडून रविवारी सकाळी गावडे यांनी पदभार स्वीकारला. कारागृहात अगोदर काम केल्यामुळे त्यांना याची माहिती आहे. कळंबा कारागृहात अपुरा कर्मचारीवर्ग आहे. तो वाढविण्यासाठी त्यांनी वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केला आहे.
कारागृहात यापूर्वी ज्या चुकीच्या गोष्टी झाल्या, त्या पुन्हा होणार नाहीत, यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. एखादा कर्मचारी चुकीचा वागला, सुरक्षेत काही गैरप्रकार केला, तर अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठांना पत्रव्यवहार केला जाईल. असे कर्मचारी बडतर्फ करण्यासाठी आपले प्रयत्न राहतील.
कारागृहात येणारे कच्चे कैदी अथवा शिक्षा झालेल्या कैद्यांवर करडी नजर ठेवली जाईल. जे कैदी वादग्रस्त आहेत किंवा त्यांच्याकडून सुरक्षेला धोका आहे, अशांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
कारागृहात मोबाईल, सीमकार्ड अथवा कोणताही अमली पदार्थ येणार नाही, यासाठी सुरक्षारक्षकांना नेहमी सतर्क ठेवण्यात येईल. कारागृहाचे विस्तारीकरण, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न आणि फाशी यार्ड या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचेही गावडे यांनी यावेळी सांगितले.