कोल्हापूर : टेंबलाईवाडी येथे पुढील वर्षभरात आय. टी. पार्क उभारण्यात येणार असून, अनेक नामांकित कंपन्या कोल्हापुरात येण्यास इच्छुक आहेत, त्यांच्याशी आपली चर्चाही सुरू आहे, अशी माहिती पालकमंत्री तथा माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
कोल्हापुरात आय. टी. पार्क उभारण्यास टेंबलाईवाडी येथे इमारतीसह जागा उपलब्ध झाली आहे. मुद्रांक शुल्कचा तांत्रिक मुद्दा अडचणीचा आहे. त्याबाबत मुद्रांक शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माझी चर्चा सुरू आहे. विषय लवकरच मार्गी लागेल. त्यानंतर महिन्याभरात निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. या आय. टी. पार्क प्रकल्पाचे कन्सल्टंट केडीएमजी असून डिझाईन, कागदपत्रे तयार करण्याकरिता वेळ मागून घेतली आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
३० ते ४० टक्के स्थानिक तरुणांना प्राधान्य
आय. टी. पार्क कोल्हापुरात सुरू केल्यानंतर येथे येणाऱ्या कंपन्यांना जे तज्ज्ञ मनुष्यबळ लागणार आहे, त्यापैकी ३० ते ४० टक्के स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तशी बोलणी आत्ताच संंबंधित कंपन्यांशी केली जात आहे. त्यामुळे स्थानिकांना पुणे, मुंबई किंवा अन्य शहरांत जाण्याऐवजी येथेच रोजगार मिळू शकेल, असे पाटील यांनी सांगितले.
महापालिकेचे ॲप, वेबसाईट
महापालिकेची ई गव्हर्नन्स सेवा अधिक सक्षम करण्याकरिता लवकरच एक ॲप व वेबसाईट सुरू केली जाणार आहे. येत्या आठ दिवसांत त्याचे उद्घाटन करण्याचा माझा विचार आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाली की नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देणे सोयीचे होईल, असा विश्वास पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री पाटील यांच्या सूचना-
- टर्न टेबल लॅडर वाहन घेण्यास वर्क ऑर्डर द्या.
- हॉकी स्टेडियम ॲस्ट्रो टर्फची निविदा प्रक्रिया राबवा.
- पालिका रोजंदारी कर्मचाऱ्यांचा कायम करण्याचा प्रस्ताव सादर करा.
- शासन निधीतील रस्त्यांच्या कामाची गती वाढवा.
अंबाबाई आराखडा अट शिथिल करणार
अंबाबाई मंदिर परिसराचा विकास आराखडा मंजूर असून त्याच्या पहिल्या टप्प्यातील कामेही सुरू झाली आहेत. आता दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव सादर करण्यास तांत्रिक अडचण आहे. पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण होऊन त्याचा वापर सुरू झाल्याचे प्रमाणपत्र दिले तरच दुसऱ्या टप्प्यातील कामांचा निधी मिळणार आहे; पण ही अट जाचक आहे. त्यामुळे ही अट शिथिल करून घ्यावी लागणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. महापालिकेत झालेल्या बैठकीस आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते.