लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : गावागावांमध्ये सौख्य अबाधित राहावे, कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी पोलीसपाटील हा अत्यंत महत्त्वाचा घटक अनेक वर्षांपासून गावच्या प्रशासन रचनेच अंतर्भूत करण्यात आला आहे. पोलीसपाटलांकडे अर्धन्यायिक व प्रशासकीय कामे असल्याने जनता, प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांच्यामधील ते महत्त्वाचा दुवा आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. कोल्हापूर जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने शनिवारी केशवराव भोसले नाट्यगृहात पोलीसपाटलांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन व पोलीसपाटील मार्गदर्शिकेचे प्रकाशन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामीण रचनेतील पोलीसपाटील हा अनेक वर्षांपासून महत्त्वाचा घटक राहिला असल्याचे सांगून मंत्री पाटील म्हणाले, गावात समृद्धी आली की, व्यसने आणि गैरप्रकारही येतात. या सर्वांना आळा घालण्यासाठी पोलीसपाटील महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. पोलीसपाटील, कृषी सेवक, ग्रामसेवक, तलाठी आणि वायरमन हे कर्मचारी गावागावांमध्ये शासनाचे प्रतिनिधी असतात. त्यांनी शासनाच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचविल्या आणि आपले काम चोखपणे केले तर राज्य अधिक समृद्ध होईल. महाराष्ट्र शासनाला नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या कृषी कर्जमाफीपोटी ३४ हजार कोटी, तर सातव्या वेतन आयोगासाठी २१ हजार कोटी लागणार आहेत. या सर्वांमध्ये पोलीसपाटील संघटनेच्या विविध मागण्यांबाबतही शासन सकारात्मक राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. उमेशचंद्र मोरे, गडहिंग्लजच्या उपविभागीय अधिकारी संगीता चौगुले आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, करवीर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, शाहूवाडीचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, करवीरचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, रमेश सरवदे, उदयसिंग जगताप आदींसह अधिकारी, पोलीसपाटील उपस्थित होते.
ग्रामीण रचनेत पोलीसपाटील महत्त्वाचा दुवा
By admin | Published: July 02, 2017 12:10 AM