कसबा बावडा : करवीर पंचायत समितीमध्ये सध्या सभापती बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत आमदार सतेज पाटील यांनी पंचायत समितीमधील कॉँग्रेसच्या सर्व सदस्यांची साळोखेनगर येथे बैठक बोलावली होती. या बैठकीचा तपशील समजू शकला नाही. मात्र, सतेज पाटील जेव्हा मला सभापतिपदाचा राजीनामा देण्यास सांगतील तेव्हा लगेचच राजीनामा देऊ, अशी ग्वाही सभापती प्रदीप झांबरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
सभापती प्रदीप झांबरे यांचा ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार वर्षाचा कार्यकाळ संपला असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी पी. एन. पाटील गटाच्या सदस्यांकडून सुरू आहे. त्यामुळे या बैठकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. आता सभापतिपद पी. एन. पाटील गटाकडे, तर उपसभापतिपद आमदार सतेज पाटील गटाकडे जाणार आहे.
सतेज पाटील गटाचे व पी. एन. पाटील गटादरम्यान ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार सभापती बदलाची मुदत जानेवारी २०१८ मध्ये संपली. मात्र, तरीही झांबरे यांनी राजीनामा देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पी. एन. पाटील गटाच्या सदस्यांमध्ये अस्वस्थता पसरली. सभापतिपदासाठी इच्छुक असलेल्या सदस्यांनी पी. एन. यांच्या मागे सभापतींचा राजीनामा घेण्यासाठी तगादा लावला. तरीही झांबरे यांनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे पी. एन. पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांच्याशी याबाबत चर्चा केली. चर्चेनुसार प्रदीप झांबरे यांनी राजीनामा दिल्यास जूनच्या पहिल्या आठवड्यात निवड होऊ शकते.सभापतिपदासाठी राजेंद्र सूर्यवंशी व अश्विनी धोत्रे यांची नावे
आघाडीवर आहेत. राजेंद्र सूर्यवंशी यांची पी. एन. पाटील यांना विधानसभा निवडणुकीवेळी मदत होणार आहे, तर अश्विनी धोत्रे यांचे पती कृष्णात धोत्रे हे करवीर तालुका कॉँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. या दोघांपैकी कोणाच्या गळ्यात माळ पडते, याची उत्सुकता आहे.पक्षीय बलाबलकरवीर पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे १४ सदस्य आहेत. पी. एन. व सतेज पाटील यांचे प्रत्येकी - ७, शिवसेना - ४, भाजप - ३, राष्ट्रवादी - १