गोकुळ निवडणुकीसंदर्भात सरुडकर गटाच्या शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज, शुक्रवारी सरूड येथे होणार आहे. या बैठकीनंतर माजी आमदार सत्यजित पाटील यांची गोकुळ निवडणुकीसंदर्भातील भूमिका स्पष्ट होणार आहे.
गोकुळच्या निवडणुकीत माजी आमदार सत्यजित पाटील हे ज्या विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीत सहभागी झाले. त्याच आघाडीत त्यांचे कट्टर विरोधक आमदार विनय कोरे हेही सामील झाल्याने सरुडकर गटाच्या कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर उमटला आहे. यातूनच माजी आमदार सत्यजित पाटील यांनी या विरोधी आघाडीतून बाहेर पडावे, अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, सत्यजित पाटील यांनी शाहूवाडीसह पन्हाळा तालुक्यातील गटाच्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन व त्यांच्याशी चर्चा करूनच गोकुळ निवडणुकीसंदर्भातील आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले होते. या बैठकीमध्ये सत्यजित पाटील हे गोकुळ निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असून या बैठकीतील चर्चेनंतर ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.