कोल्हापूर, दि. १७ : नाट्यकला ही माणसाच्या जीवनाचे फार महत्वाचे अंग आहे. जन्मापासूनच नाटकाने माणसाची सोबत केली आहे, ही कला तुम्हाला जगण्यातला आनंद देईल, असे प्रतिपादन कोल्हापूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी विश्वास सुतार यांनी केले.चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे रविवारी साळोखेनगर येथील कोपार्डेकर शाळेत ही एक दिवसाची मोफत संवाद लेखन, अभिनय आणि सादरीकरण या विषयावरील कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन विश्वास सुतार यांच्या हस्ते झाले.या कार्यशाळेत केवळ कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळेतील निवडक विध्यार्थ्यानाच आमंत्रित करण्यात आले होते. मुलांमध्ये नाटकांची आवड जोपासण्यासाठी या कार्यशाळेत या विद्यार्थ्यांसाठी पाच सत्रात संवाद लेखन, अभिनय आणि सादरीकरण या विषयावर साभिनय मार्गदर्शन करण्यात आले. महानगरपालिकेच्या एकूण ११ शाळेतील ७४ विद्यार्र्थ्यानी या कार्यशाळेत भाग घेतला.या कार्यशाळेमध्ये दिवसभरात ज्येष्ठ नाट्य प्रशिक्षक संजय हळदीकर यांनी ‘अभिनय कला’, प्रा. टी. आर. गुरव यांनी ‘संवाद लेखन’ आणि सादरीकरण या विषयावर संजय तोडकर यांनी मार्गदर्शन केले. समारोपाच्या सत्रात सहभागी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष संवाद अभिप्रायाचे लेखन केले. रोजच्या वापरातील वस्तू व रोजचेच संवाद यांचा अचुक वापर केला तर सुंदर नाट्याकृती निर्माण होते याची अनुभूती विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत घेतली.चिल्लर पार्टीचे मिलींद कोपार्डेकर, उदय संकपाळ, ओंकार कांबळे, चंद्रशेखर तुदीगाल, महेश शिंगे यांनी कार्यशाळेचे संयोजन केले.पाठ्यपुस्तकातील धड्यांच्या आधारावर पूर्वतयारी
या कार्यशाळेत सहभागी होणाºया इयत्ता पाचवी, सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांकडून मराठीच्या पाठ्यपुस्तकातील धड्यांच्या आधारावर एक स्कीट बसविले जाणार असून त्यासाठी संबंधित शिक्षक पूर्वतयारी करून घेणार आहेत. या विद्यार्थ्यांनी बसविलेल्या छोट्या-छोट्या स्किटचे सादरीकरण करण्यासाठी महिन्याचा अवधी देण्यात येणार आहे, त्यानंतर एका कार्यक्रमात हे स्किट प्रत्यक्ष सादर करण्यात येणार आहे. यासाठी चिल्लर पार्टीचे सदस्य या विद्यार्थ्यांना मदत करणार आहेत. या पध्दतीने अभ्यास लक्षात ठेवायलाही विद्यार्थ्यांना मदत होणार आहे.