लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांच्या मजुरीमध्ये यंदा ८ पैशांची वाढ सहायक कामगार आयुक्तांनी एकतर्फी घोषित केली आहे. त्याला सर्वच यंत्रमागधारक संघटनांचा विरोध आहे. तीन वर्षांपूर्वीच सन २०१३च्या करारातून बाहेर पडल्याचा ठराव संघटनांच्या बैठकीत करण्यात आला होता. त्याची प्रतही दिली आहे, अशी माहिती पॉवरलूम असोसिएशनच्या वतीने प्रसिद्ध पत्रकाद्वारे देण्यात आली.
सन २०१३मध्ये यंत्रमागधारक संघटना व कामगार संघटनांमध्ये झालेल्या ठरावात दरवर्षीच्या महागाई भत्त्यानुसार पीस रेटवर रूपांतरित करून मजुरीवाढ देण्याचे ठरले होते. परंतु सध्या यंत्रमाग उद्योगातील मंदी, राज्य व केंद्र सरकारचे दुर्लक्ष, आयात-निर्यातीचे धोरण, सूतदराचे धोरण, सुट्या भागांची दरवाढ, वीज दरवाढ अशा विविध कारणांमुळे हा उद्योग अडचणीत सापडला आहे. त्यामुळे दरवर्षी मजुरीवाढ देणे अशक्य बनले आहे. त्याचबरोबर ट्रेडिंग असोसिएशनने खर्चीवाले यंत्रमागधारकांना गेल्या आठ वर्षात मजुरीवाढ दिलेली नाही. त्यामुळे सन २०१३च्या करारातून यंत्रमागधारक संघटना बाहेर पडत असल्याचे सर्व संघटनांच्या मेळाव्यात ठराव करून जाहीर करण्यात आले होते.
त्याचबरोबर पुणे येथील अतिरिक्त कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांना भेटून यंत्रमाग उद्योगाविषयीची सविस्तर माहिती दिली होती. त्यामुळे यंदा मजुरीवाढीची घोषणा करू नये. त्याची अंमलबजावणी केली जाणार नाही, असे निवेदन दिले होते. त्यावर पोळ यांनी येत्या काही दिवसांत यंत्रमागधारक संघटना व कामगार संघटना यांची बैठक बोलविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु कोणतीही बैठक न घेता एकतर्फी मजुरीवाढ घोषित केली. ही दरवाढ राज्यातील फक्त इचलकरंजी केंद्रात जाहीर होत असल्याने उत्पादन खर्चात तफावत निर्माण होऊन बाहेरच्या बाजारपेठांतून मागणी येत नाही. त्यामुळे मजुरीवाढ देणे अशक्य असल्याचे म्हटले आहे.