कोल्हापूर : विविध समाजांच्या एकजुटीने समतेच्या या करवीरनगरीत रविवारी रात्री ‘ऐक्य स्नेहमेळाव्या’तून शाहू विचारांचे प्रतिबिंब उमटले. यातून सामाजिक समतेचा संदेश देत एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. या मेळाव्यातून सर्व समाज बांधवांना एकत्र आणण्याचे काम करण्यात आले आहे, असे मत शाहू छत्रपती यांनी व्यक्त केले. गेले चार दिवस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या राजर्षी शाहू मराठा महोत्सवाचा समारोप झाला.मराठा महासंघातर्फे आयोजित राजर्षी शाहू मराठा महोत्सवात सायंंकाळी दसरा चौकातील मैदानावर कोल्हापुरातील ९० समाजांचा ऐक्य स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे म्हणून शाहू छत्रपती उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत पी. बी. पवार, वसंतराव मुळीक, बबन रानगे, मारुतीराव कातवरे, कादर मलबारी, अशोक भंडारे, रमेश तनवाणी, गणपतराव बागडी, एस. पी. कांबळे, हसन देसाई, उमेश पोर्लेकर, अनिल गिरी, दिलीप ओतारी, शिवाजी कोरवी, दिलीप भुर्के, दीपक पोलादे, मनीष झंवर, सोमनाथ घोडेराव, सरलाताई पाटील, रामसिंग रजपूत, सुखदेव बुध्याळकर, अशोक माळी, आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी विविध समाजांच्या प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. शाहू छत्रपती म्हणाले, काही वेळेला समाजासमाजांमध्ये दुरावा निर्माण होण्याचे प्रकार होतात; त्यामुळे सर्व समाजांनी एकदिलाने राहण्याची गरज आहे. त्यासाठी ‘ऐक्य स्नेहमेळावा’ मार्गदर्शक आहे. असेच विचार राजर्षी शाहू महाराजांचे होते. त्याची जपणूक करण्याचे काम होत आहे. पी. बी. पवार म्हणाले, समाजासमाजांतील वाद हे देशाला घातक आहेत; त्यामुळे महापुरुषांचे विचार खऱ्या अर्थाने आता पुन्हा रुजविण्याची गरज आहे. शाहूंच्या विचारांचा वारसा या ऐक्य मेळाव्याच्या निमित्ताने जपला आहे.मुळीक म्हणाले, महोत्सवाच्या माध्यमातून वर्तमानात जाऊन भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न झाला आहे. यातून नक्कीच विचारांचा जागर होऊन नव्या पिढीला योग्य दिशा मिळू शकेल. यावेळी शशिकांत पाटील, अवधूत पाटील, दिलीप पोवार, आदी उपस्थित होते.मराठा वधू-वर मेळाव्यातून सुसंवाददरम्यान, महोत्सवात सकाळी झालेल्या मराठा वधू-वर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये कोल्हापूर, सांगलीसह सीमा भागातील पालक व विवाहेच्छुक युवक-युवती आले होते. यावेळी १८० जणांची नोंदणी झाली. विवाह जुळताना येणाºया आडनावांपासून कुंडली, नोंदणी, आदी विषयांमधील अडचणींबाबत पालकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्याशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न यावेळी झाला.ज्ञाती बांधवांनी दिल्या भेटीमहोत्सवात दुपारच्या सत्रात बुलडाणा, कºहाड, सांगली, सातारा येथील ज्ञाती बांधवांनी भेट दिली. यामध्ये खामगाव (जि. बुलडाणा) येथील राजेश मुळीक यांच्यासह २0हून अधिक जणांनी या ठिकाणी येऊन खामगाव येथे झालेल्या ऐतिहासिक राजर्षी शाहूंच्या शिक्षण परिषदेच्या आठवणी ताज्या केल्या.
एकजुटीने उमटले शाहू विचारांचे प्रतिबिंब; नव्वद समाजांचा ऐक्य स्नेहमेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:46 AM