कोल्हापूर : पुणे, मुंबई येथून आलेल्या आयकर अधिकाऱ्यांनी बुधवारी येथील नागाळा पार्क, कदमवाडी, न्यू शाहूपुरी, राजारामपुरी परिसरातील प्रसिद्ध चार डॉक्टरांची रुग्णालये, निवासस्थानांवर एकाच वेळी छापे टाकले. कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्राप्तिकर विभागाचे पंधरा अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते. रात्री उशिरापर्यंत कागदपत्रांची कसून तपासणी करण्यात आली.
या चारही रुग्णालयांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यासाठी पुणे आयकर विभागातील अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या पथकांनी बुधवारी सकाळी नियोजन करून एकदमच छापे टाकले. दिवसभर त्या-त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना तिथेच बसवून ठेवण्यात आले होते. त्यांचा बाहेरच्या कुणाशीही संपर्क होऊ दिला नव्हता.
रुग्णालय कागदपत्रांसह इतर आर्थिक बाबींची कसून चौकशी करण्यात येत होती. छापा टाकणाऱ्यांत कोल्हापूरसह सांगली, सातारा व पुण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
आयकर विभागाने एकाचवेळी मोठा फौजफाटा घेऊन ही कारवाई केली असली तरी त्यामध्ये काय हाती लागले, हे समजू शकले नाही. छापे पडल्यासंबंधीची माहिती दिवसभर प्रत्येकजण मोबाईलद्वारे एकमेकांना विचारताना दिसत होते.