कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला बुधवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या पुढाकारातून, अंबाबाईला सोन्याचा मुलामा असलेली प्रभावळ अर्पण करण्यात आली. भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या हस्ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे प्रभावळ सुपूर्द करण्यात आली. यासाठी ४५ तोळे वापरले असून त्याची किंमत ३५ लाख रुपये इतकी आहे. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर ही प्रभावळ वापरात येणार आहे.श्री अंबाबाई देवीवरील श्रध्देपोटी भाविकांकडून, रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने अर्पण केले जातात. खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखालील सुवर्ण पालखी ट्रस्टच्या वतीने यापूर्वीच देवीला सुवर्ण पालखी अर्पण करण्यात आली आहे. त्यानंतर देवीची सुवर्ण प्रभावळ घडवण्याचा संकल्प केला होता. यासाठी २४ कॅरेटचे ४५० ग्रॅम म्हणजेच ४५ तोळे सोने वापरण्यात आले. गणेश चव्हाण आणि कारागिरांनी हे काम पूर्ण केली. यावेळी महेंद्र ज्वेलर्सचे संचालक भरत ओसवाल महेंद्र इनामदार, जितेंद्र पाटील, अवनी सेठ, रामाराव, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Kolhapur: अंबाबाईच्या प्रभावळीला सुवर्णझळाळी, ४५ तोळे सोन्याचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 1:36 PM