यवलूज : पन्हाळा तालुक्यातील माजगावसह पडळ, यवलूज, खोतवाडी, देवठाणे, कसबा ठाणे आदी गावच्या नदीकाठचे अनेक वीज खांबासह वीज वाहक तारा कोलमडून पडल्या आहेत. ट्रान्सफॉर्मर भुईसपाट झाले आहेत. परिणामी शेती कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. पावसाने ओढ दिल्याने पाण्याअभावी पिके वाळू लागली आहेत. तरी महावितरणने तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दालमिया परिसर अध्यक्ष दगडू गुरवळ व शेतकऱ्यांनी कळे वीज केंद्राचे अभियंता पाटणकर यांच्याकडे केली आहे.
महापुरात कासारी नदीकाठीच्या पिकांना फटका बसला. शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले, पण गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे उरलीसुरली पिके पाण्याअभावी वाळू लागली आहेत. वीज खांब कोसळल्यामुळे कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. तरी महावितरणने पिके जगविण्यासाठी वीज खांब तत्काळ उभा करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
यावेळी बाळू खोत, प्रधान खोत, गुंडाहरी खोत, विष्णू गुरवळ, सचिन दुर्गे, शिवाजी गुरवळ, वसंत शिंदे, सतीश गौड, भैरु रणदिवे, अमर रणदिवे, सनी खोत, सरदार खोत व शेतकरी उपस्थित होते.
फोटो ओळ:- कृषिपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करावा या मागणीचे निवेदन पाटणकर यांना देताना दगडू गुरवळ, प्रधान खोत, बाळू खोत आदी.