लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकरी संघाच्या एका संचालकाच्या गुळाची थकबाकी भागवण्यासाठी चक्क चार पेट्रोल पंपांवरील अकरा लाखांची उचल करण्याचा प्रताप संघ व्यवस्थापनाने केला आहे. संबंधित संचालकांच्या नावावार डिझेल व पेट्रोल विक्री दाखवून पैशांची उचल केली असली तरी अकरा लाखांचे ४ लाख ५० हजार व्याज माफ करण्याचा प्रयत्न असल्याने काही संचालक व कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
एका संचालकाने साडेचार वर्षांपूर्वी संघाच्या गूळ अडत दुकानात गूळ लावण्यापोटी अकरा लाखांच्या ॲडव्हान्सची उचल केली. मात्र, त्यातील एक दमडीही भरली नाही. नियमानुसार जर घेतलेल्या ॲडव्हान्सची हंगामात परतफेड झाली नाही, तर त्यावर व्याज आकारणी करायची असते. त्यानुसार साडेचार लाख व्याज झाले. शासकीय लेखा परीक्षकांनी या थकबाकीवर आक्षेप घेत भरण्याचे आदेश दिले, तरीही संबंधित संचालकाने पैसे भरले नाहीत. लेखा परीक्षकांच्या कारवाईतून वाचण्यासाठी ‘त्र्यंबोली’, ‘बिद्री’, ‘नेसरी’ व ‘कार्वे’ या पेट्रोल पंपांवर संबंधित संचालकाच्या नावे डिझेल व पेट्रोल विक्री उधारीवर दाखवून तेथील अकरा लाखांची उचल केली. ते गुळाच्या थकबाकीला भरले. यावर एका युवा संचालकाने जोरदार हरकत घेत भंडाफोड करण्याची धमकी दिल्यानंतर संबंधित संचालकाने सहा लाख रुपये जमा केले. मात्र, उर्वरित पाच लाख व व्याज भरणार नाही, यावर ते ठाम आहेत.
पाच लाखांचा ‘धनी’ कोण?
संचालकाने ११ लाख आपल्या नावावर उचल केली आणि त्यातील दुसऱ्या संचालकाला पाच लाख दिले. ते संचालक सध्या अपात्र असल्याने त्यांनी हात वर केल्याचे समजते. त्यामुळे पाच लाखांचा ‘धनी’ कोण? देणारा, घेणारा की द्यायला लावणारा, याविषयी संघात जोरदार चर्चा सुरू आहे.
एका चॉकलेटसाठी कर्मचारी निलंबित
तात्यासाहेब मोहिते, बाबा नेसरीकर यांच्यासारख्या नेत्यांनी संघाला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवले, त्यामागे त्यांचा त्याग होता, कर्मचाऱ्यांना लावलेली शिस्त होती. मेडिकलच्या दुकानात सुटे पैसे नसले तरी ग्राहकांना चॉकलेट दिले जात होते. त्या चॉकलेटच्या बरणीतील एक चॉकलेट कमी होते, म्हणून बाबा नेसरीकर यांनी संबंधित कर्मचाऱ्याला एक दिवस निलंबित केले होते.
कोट-
गुळापोटी सगळ्यांनाच ॲडव्हान्स दिला जातो, ‘त्या’ संचालकाचे ११ लाख थकीत होते, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, त्यांनी पैसे भरले आहेत, साडेचार लाख व्याजमाफीसाठी त्यांनी अर्ज केला आहे.
- जी. डी. पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघ