कोल्हापूर : जिल्ह्यात ४५ वर्षांवरील नागरिकांची लस घेण्यासाठी केंद्रावर गर्दी उसळत असताना अठरा वर्षांवरील तरुणांमध्ये काहीसा निरुत्साह दिसत आहे. शनिवारी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १८ ते ४४ वयोगटातील तरुणांसाठी लसीकरण केंद्राची दारे उघडली खरी; पण शुभारंभानंतर दुसऱ्या दिवसअखेर दोन हजार उद्दिष्टापैकी अवघ्या १२७९ जणांनी लस टोचून घेतली आहे.
सध्या लस घेण्याची मानसिकता वाढली असताना ती वेळेत उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्रावर पहाटेपासूनच रांगा लावण्याची वेळ आली आहे. मात्र, तरुणांसाठी शनिवारपासून तिसऱ्या टप्प्यांतर्गत जिल्ह्यात सुरू झालेल्या लसीकरणाला मात्र सुरुवातीच्या टप्प्यात थंड प्रतिसाद दिसत आहे.
जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावावरील लसीकरणासाठी विक्रमनगर येथील भगवान महावीर दवाखाना, शिरोळ ग्रामीण रुग्णालय, भेडसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, गांधीनगर वसाहत रुग्णालय, कागल ग्रामीण रुग्णालय ही पाच केंद्रे निश्चित केली आहेत. शनिवारपासून येथे लसीकरण सुरू झाले. प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी २०० याप्रमाणे उद्दिष्ट निश्चित केले आहे. शुभारंभ झाल्याच्या पहिल्याच दिवशी पाच केंद्रांवर अवघ्या ३६३ जणांनी लस घेतली. रविवारी यात सुधारणा झाली. या केंद्रांवर ९१६ जणांनी लस घेतली.
निश्चित केलेल्या पाच केंद्रांवर रोज १ हजार तरुणांना लस मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे, पण पहिल्या दोन दिवसांत अपेक्षित उद्दिष्ट गाठता आलेले नाही. पुढील सात दिवस अशाच प्रकारे लस दिली जाणार असून, त्यानंतर लस उपलब्ध होईल, तशी लसीकरण केंद्रे वाढविली जाणार आहेत; पण यासाठी आधी कोविन ॲपवर नाेंदणी करणे बंधनकारक आहे.