लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) गोकूळ शिरगाव येथील दूध प्रकल्पास उद्या, सोमवारी सकाळी अकरा वाजता सत्तारूढ आघाडीचे नेते भेट देणार आहेत. या वेळी त्यांच्या हस्ते ‘अमृतकलश’ पूजन होणार असून, संघाच्या कामकाजासह दूध प्रकल्पाची माहितीही ते घेणार आहेत.
‘गोकूळ’च्या निवडणुकीत विरोधी राजर्षि शाहू शेतकरी आघाडीने २१ पैकी १७ जागा जिंकून सत्तांतर घडवले. सभासदांनी मोठ्या विश्वासाने सत्ता दिल्याने त्याचा वापर दूध उत्पादकांच्या हितासाठी करा, असा आदेश नेत्यांनी संचालक मंडळाला दिला आहे. त्यानुसार काटकसरीचा कारभार संचालक मंडळाने सुरू केला आहे. विश्वास पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी कामकाजास सुरुवात केली आहे. नेत्यांच्या अथक प्रयत्नानंतर ‘गोकूळ’च्या इतिहासात पहिल्यांदाच सत्तांतर घडवण्यात यश आले. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे व अमृतकलश पूजन करण्यासाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, चंद्रदीप नरके, ए. वाय. पाटील आदी नेत्यांना अध्यक्ष पाटील यांच्यासह संचालकांनी निमंत्रण दिले आहे.
अनेक नेते पहिल्यांदाच पाऊल ठेवणार
गेली अनेक वर्षे ‘गोकूळ’ वर आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता होती. त्यामुळे इतर नेत्यांचा ‘गोकूळ’ दूध संघाशी थेट संपर्क कधी आलाच नाही. त्यामुळे बहुतांशी नेते पहिल्यांदाच ‘गोकूळ’च्या मुख्य कार्यालयात पाऊल ठेवणार आहेत.