प्रभाग कानोसा : प्रभाग क्रमांक ३७ : राजारामपुरी तवन्नाप्पा पाटणे हायस्कूल : विद्यमान नगरसेविक : प्रतिज्ञा उत्तुरे, आताचे आरक्षण : सर्वसाधारण,
विनोद सावंत/लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : उच्चभ्रू, मध्यमवर्गीय वस्ती असणारा राजारामपुरी तवन्नाप्पा पाटणे हायस्कूल प्रभाग क्रमांक ३७ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत बिग फाइट लढत आहे. सर्वसाधारण प्रभाग झाल्याने चुरस वाढली आहे. मातब्बर उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका यांनी केलेल्या विकासकामांमुळे विरोधी पक्षांतील उमेदवारांना त्यांचे मोठे आव्हान ठरत आहे. सध्याच्या घडीला सहा ते सात तगडे उमेदवार रिंगणात असून ही निवडणूक त्यांच्यासाठी तसेच पक्षातील नेत्यांसाठी प्रतिष्ठेची आहे.
शहरातील हाय व्होल्टेज लढतींपैकी राजारामपुरी तवन्नाप्पा पाटणे हायस्कूल प्रभाग आहे. सर्व मातब्बर उमेदवार असल्याने त्यांच्याकडून साम, दाम, दंड, भेद नीतीचा अवलंब केला जात आहे. सध्या निवडणुकीची तारीख निश्चित नसली तरी येथील राजकीय वातावरण तापलेलेच आहे. गत निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या प्रतिज्ञा उत्तुरे यांनी या प्रभागात बाजी मारली. राष्ट्रवादीच्या मृदुला पुरेकर यांनी त्यांना चांगली लढत दिली. भाजपच्या वैशाली पसारे यांना तिसऱ्या क्रमांकाची, तर काँग्रेसच्या माया संकपाळ यांना चौथ्या क्रमांकाची मते मिळाली. शहरात शिवसेनेचे जे चार उमेदवार निवडून आले, त्यांपैकी उत्तुरे ह्या एक आहेत.
शिवसेनेच्या नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे सलग चार वर्षे स्थायी समितीच्या सदस्य होत्या. त्या महापालिकेच्या पहिल्या महिला परिवहन समिती सभापती ठरल्या. सभापती असताना त्यांनी केएमटीच्या उत्पन्नवाढीसाठी उल्लेखनीय काम केले. सीएनजी बस, महिलांसाठी ई-टाॅयलेट, बसमध्ये एलईडी संच, पार्किंग अद्ययावत करून केएमटी फायद्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले. प्रधान कार्यालय नूतनीकरण, मुख्य यंत्रशाळा परिसरात सोलर सिस्टीम बसविण्यास मंजुरी आणली. महापालिकेच्या सभागृहात तसेच स्थायी समितीच्या सभेत त्यांनी प्रभावीपणे प्रश्न मांडले. महापूर आणि कोरोनामध्ये प्रभागात मदतकार्य केले. या कामाच्या जोरावर प्रतिज्ञा उत्तुरे किंवा त्यांचे पती महेश उत्तुरे शिवसेनेतून रिंगणात उतरणार आहेत.
राष्ट्रवादी जनसुराज्य पक्षाचे माजी नगरसेवक मुरलीधर जाधव यांचा प्रभाग क्रमांक ३९ महिलांसाठी आरक्षित झाल्याने त्यांनी या प्रभागामधून वहिनी दीपिका दीपक जाधव यांना रिंगणात उतरविले आहे, तर स्वत: प्रभाग क्रमांक ३७ मधून निवडणूक लढविणार आहेत. जाधव कुटुंबीयांनी आतापर्यंत पाच वेळा महापालिकेत प्रतिनिधित्व केले आहे. दीपक जाधव दोन वेळा नगरसेवक होते. यामध्ये त्यांनी महापौरपदही भूषविले. मुरलीधर जाधव यांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केले असून, गत सभागृहात त्यांनी स्थायी समिती सभापतिपद भूषविले आहे. प्रभाग क्रमांक ३७ मध्ये २००५ ते २०१५ या कालावधीत त्यांनी काम केले असून, हा आपला बालेकिल्ला असल्याचा ते दावा करीत आहेत. त्यांनी कोरोनामध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या प्रभागातून कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार, याबाबत ते आमदार विनय कोरे, ज्येष्ठ नगरसेवक जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेणार आहेत.
शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांनीही जोरदार तयारी केली आहे. २०१० मध्ये थोडक्या मताने पराभूत झाल्यानंतर त्यांनी न खचता सामाजिक काम सुरूच ठेवले. २०१५ मध्ये प्रभाग नागरिकांचा मागासवर्ग महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने त्यांना निवडणूक लढविता आली नाही. शिवसेनेच्या प्रतिज्ञा उत्तुरे यांना त्यांनी पाठिंबा दिला होता. गेल्या १७ वर्षांपासून राजारामपुरीत ते रक्तदान शिबिर घेतात. ‘राजारामपुरी गोज ग्रीन’च्या माध्यमातून ते सामाजिक कामात सक्रिय आहेत. गेल्या २० वर्षांपासून वृक्षारोपण मोहीम राबवीत आहेत. शहराच्या टोल, एलबीटी, घरफाळा, वीजदरवाढ रूपांतरित कर नोटीससंदर्भातील आंदोलनात ते सहभागी असतात. या प्रभागातून ते काँग्रेसकडून इच्छुक आहेत.
पालकमंत्री सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक, माजी नगरसेवक राजू पसारे यांचे पुतणे वैभव ऊर्फ रामा पसारे यांनीही प्रभागात प्रचार सुरू केला आहे. कोरोनाकाळात त्यांनी राजाराम तलाव जलतरण मंडळाच्या माध्यमातून मदत केली. त्यांचा प्रभागात चांगला जनसंपर्क आहे. तेही काँग्रेसकडून इच्छुक आहेत.
भाजपचे राजारामपुरी मंडल सरचिटणीस अभिजित शिंदे गेल्या अडीच वर्षांपासून सामाजिक कार्यात आहेत. आयुष्यमान भारत योजना, ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप तसेच कोरोना काळातही त्यांनी मदतीचा हात दिला. या कामाच्या जोरावर ते भाजपमधून इच्छुक आहेत. तसेच नितीन पाटील, अमर निंबाळकर यांच्या नावांचीही चर्चा आहे. त्यांचाही प्रभागात चांगला संपर्क आहे.
प्रतिक्रिया
राज्य शासन, जिल्हा नियोजन, आमदार, खासदार फंडाच्या माध्यमातून तब्बल १३ कोटींचा निधी खेचून आणला. प्रभागातील ८० टक्के ड्रेनेजलाइन, पिण्याची पाइपलाइन बदलली. प्रभागातील ३० वर्षे प्रलंबित असलेला रस्ते, ड्रेनेजलाइन, पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविला. केएमटीतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा १० वर्षे रखडलेला फंड व पेन्शनचा प्रश्न मार्गी लावला. बाळासाहेब ठाकरे उद्यानाचा ठराव तसेच भाडेकरार रद्द करणे असे महत्त्वाचे ठराव केले.
- प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेविका
चौकट
गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते
प्रतिज्ञा उत्तुरे (शिवसेना) ११७६
मृदुला पुरेकर (राष्ट्रवादी) ९०९
वैशाली पसारे (भाजप) ८६५
माया संकपाळ (काँग्रेस) ५५०
चौकट
पाच वर्षांत झालेली प्रमुख कामे
राजारामपुरीत जुन्या, गंजलेल्या पाइपलाइनमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. नवीन पाइपलाइन टाकून तो मार्गी लावला.
नऊ नंबर शाळेच्या मैदानात नवीन पाण्याची टाकी उभारून राजारामपुरीचा पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न.
शाळा क्रमांक ९ मैदानाचे सुशोभीकरण
अमृत योजनेतून प्रभागातील ९० टक्के ड्रेनेजलाइन बदलली. प्रत्येकाला पिण्याच्या पाण्याचे नवीन कनेक्शन तसेच पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा
संपूर्ण प्रभागात एलईडी
प्रभागातील ८० परिसरातील महावितरणच्या केबल भूमिगत केल्या.
प्रभागातील प्रमुख रस्त्याच्या बाजूने फुटपाथ उभारले.
गल्ली क्रमांक ९ ते १४ मुख्य पाइपलाइन बसवून २५ वर्षांचा पाण्याचा प्रश्न सोडविला.
प्रभागातील २७ पॅसेज आणि २५ मुख्य गल्लीतील डांबरीकरण केले.
चौकट
शिल्लक कामे
मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना त्रास
२० टक्के गटारी करणे बाकी
पॅसेज, बोळातील नियमित स्वच्छता होत नाही.
बाजारपेठ असल्याने पार्किंगची समस्या, सीसीटीव्हीचा अभाव
राजारामपुरी नवी गल्ली येथील रस्त्यासाठी निधी मंजूर; पण कामाला सुरुवात नाही.
फोटो : १५०३२०२१ कोल महेश उत्तुरे नावाने
ओळी : कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक ३७, राजारामपुरी तवन्नाप्पा पाटणे हायस्कूल प्रभागातील खराब रस्ते नव्याने करण्यात आले आहेत.