लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाच्या निमित्ताने का होईना कोल्हापूरकरांनी गतवर्षीप्रमाणे यंदाही घरगुती गणेश विसर्जन कुंडात करून लाडक्या बाप्पाला निरोप देत पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने आणखी एक दमदार पाऊल पुढे टाकले. दिवसभरात १६० कुंडांमध्ये ३५ हजार मूर्ती आणि ८० टन निर्माल्य जमा झाले.
पंचगंगा नदीसह तलावावर थेट पाण्यात मूर्ती विसर्जित करण्यास महापालिकेने मज्जाव केला होता. त्याऐवजी प्रत्येक प्रभागात दोन या प्रमाणे १६० कृत्रिम कुंड तयार करण्यात आले होते. या शिवाय गणेश मंडळांनीदेखील मूर्ती विसर्जनासाठी कुंड आणि निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली होती.
यासाठी महापालिका प्रशासनाने ३०० कर्मचाऱ्यांची यंत्रणा तैनात करण्यात आली होती. दान केलेली मूर्ती इराणी खणीत विधिवत विसर्जन करण्यास स्वतंत्र २०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. ही सर्व यंत्रणा सकाळपासून शहरभर राबत होती. त्याला पर्यावरणप्रेमी नागरिकांसह तरुण मंडळातील कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभत होते.
पंचगंगा नदी घाट, रंकाळा, कोटीतीर्थ तलाव येथे प्रामुख्याने विसर्जन होत होते; पण यावर्षी प्रशासनाने तिथे पोहोचण्यास मज्जाव केला, बॅरिकेड्स लावून मार्ग अडवण्यात आले होते. मूर्ती घेऊन येणाऱ्यांना मूर्ती आणि निर्माल्य दान करण्याचे आवाहन केले होते, त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसादही मिळाल्याचे दिसत होते.
सकाळपासून विसर्जनाला फारसा वेग नव्हता, पाऊस असल्याचाही परिणाम जाणवत होता. ११ नंतर मात्र वातावरण निवळले. संध्याकाळी तर पाऊस गायब झाल्याने आनंद अधिक द्विगुणित झाला. सहकुटुंब विसर्जनाचा आनंद अनेकांनी लुटला. रात्री १० पर्यंत ३५ हजार मूर्ती संकलित झाल्या तर ८० टन निर्माल्य जमा झाले. मूर्ती रात्री उशिरापर्यंत इराणी खणीमध्ये महापालिकेतर्फे विसर्जित केल्या जात होत्या. निर्माल्य खत तयार करण्यासाठी देण्यात आले.