कोल्हापूर : उजळाईवाडी (ता. करवीर) येथील सरपंच सुवर्णा माने आणि ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे यांनी पदाचा गैरवापर करून संगनमताने नालेसफाईच्या कामावरील जेसीबी यंत्रणासाठी २५० लिटर डिझेलसाठी २२ हजार ५४२ रुपये दिले आहेत. आर्थिक लाभापोटी त्यांनी हे पैसे दिले आहेत. यामुळे सरपंच माने, अधिकारी कापसे यांच्या प्रशासकीय कामकाजासाठीच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन आठ सदस्यांच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजयसिंह चव्हाण यांना सोमवारी दिले.
निवेदनात म्हटले आहे, ग्रामपंचायतीच्या ३० जून २०२१ च्या मासिक बैठकीत जेसीबीसाठी २५० लिटर डिझेलवर २२ हजार ५४२ रुपये खर्च केल्याचे सदस्यांच्या निदर्शनास आले. नालेसफाईच्या कामासाठी जेसीबी यंत्राचा वापर करण्यात आला. या यंत्राला नियमबाह्यपणे २५० लिटर डिझेलचे पैसे दिले. मासिक बैठकीत हा प्रकार सदस्यांना कळाला. यासंबंधी सरपंच माने यांना विचारणा करण्यात आली. पण त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. मासिक बैठकीत जेसीबी कामाचा आराखडा मंजुरी करून घेतला नाही. करवीर पंचायत समितीकडून प्रशासकीय मान्यताही घेतलेले नाही. ग्रामपंचायतीच्या इतिवृत्तात कोणत्याही जेसीबी यंत्रणाच्या कामाचा ठराव नाही. यामुळे वैयक्तिक लाभापोटी सरपंच माने आणि अधिकारी कापसे यांनी डिझेलसाठी पैसे दिले आहेत. यावर सदस्य प्रकाश मेटेकरी, उत्तम आंबवडे, प्रतिभा पोवार, उज्ज्वला केसरकर, अलका कांबळे, सोनाली मजगे यांनी डिझेलवरील नियमबाह्य खर्चावर आक्षेप घेतला. त्यांनी सीईओ चव्हाण यांच्याकडे तक्रार केली आहे.
कोट
नालेसफाईचे काम तातडीने करणे गरजेचे असल्याने जेसीबी यंत्राचा वापर केला. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून बिले देण्यास विलंब लागत असल्याने ॲडव्हान्सपोटी जेसीबीच्या डिझेलसाठी पैसे दिले आहेत. या जेसीबीचा वापर सर्वच सदस्यांनी केला आहे. अशी वस्तुस्थिती असताना विरोधक केवळ बदनामी करीत आहेत.
सुवर्णा माने, सरपंच
फोटो : ०५०७२०२१-कोल: उजळाईवाडी निवेदन
कोल्हापुरातील जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना उजळाईवाडी ग्रामपंचायत सदस्यांच्या शिष्टमंडळाने सरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन सीईओ संजयसिंह चव्हाण यांना सोमवारी दिले.