वारणावती/वाळवा : चांदोली येथील धरणग्रस्तांना पाठिंबा देण्यासाठी व शासनाचा निषेध करण्यासाठी शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील आरळा, मणदूर, सोनवडेसह परिसरातील गावांत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाळवा येथेही हुतात्मा चौकात शासनाच्या पुतळ्याचे दहन करून गावोगावी कडकडीत बंद पाळण्यात आला.चांदोली येथे गेल्या पाच दिवसांपासून वारणा धरण व प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. शासनाने या आंदोलकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. शासनाचा निषेध करून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील आरळा, मणदूर, सोनवडेसह परिसरातील गावांत बंद पाळून शासनाचा निषेध करण्यासाठी फेरी काढण्यात आली. शासनाने दुर्लक्ष केल्याने आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात आली. आरळा येथे बसस्थानक परिसर व बाजारपेठेतील किराणा दुकाने, मटण मार्केट व भाजी मंडई परिसरातील दुकाने सकाळी बंद ठेवण्यात आली होती. शासनाच्या निषेधार्थ धरणग्रस्तांनी काळे झेंडे दाखवून निषेध फेरी काढली. धरणग्रस्तांच्या चळवळीला बळ देण्यासाठी धरणग्रस्तांच्या तरुणांबरोबरच लाभक्षेत्रातील तरुण यात मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस आंदोलन तीव्र होत चालले आहे. यावेळी आरळा येथील शिवाजी पावसकर, दिलीप पाटील, नामदेव पाटील, हिंदुराव पाटील यांच्यासह धरणग्रस्त सहभागी झाले होते. चरण गावचा उरूस असल्याने बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.आंदोलनात वाळवा परिसरातील तीनशेहून अधिक महिला सहभागी झाल्या आहेत. संक्रांतीचा सण बाजूला ठेवून कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत आहेत. परंतु शासनाकडून होत असलेली दिरंगाई पाहता आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची भावना आंदोलकांमध्ये आहे. या निषेधार्थ वाळवा येथील हुतात्मा चौकात शासनाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष नजीर वलांडकर, जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक यांनीही आंदोलनाला पाठींबा देऊन बंदचे आवाहन केले होते. माजी उपसरपंच नंदू पाटील, उमेश घोरपडे, संजय अहिर, ग्राम पंचायत सदस्य पोपट अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी विश्वास मुळीक, राजेंद्र चव्हाण, महावीर वाजे, दिलीप आचरे, हुतात्मा दूध संघाचे संचालक संजय होरे उपस्थित होते. वाळवा-शिराळ्यातील अनेक गावात कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध केला. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. आंदोलन शांततेत पार पडले. गोटखिंडी : चांदोली धरणाच्या पायथ्यास युवक नेते वैभव नायकवडी व सरपंच गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली रविवार दि. १० जानेवारीपासून सुरू असलेल्या धरणग्रस्तांच्या ठिय्या आंदोलनाकडे राज्य शासनाने पाठ फिरवली असल्याने गोटखिंडी (ता. वाळवा) येथील ग्रामस्थांच्यावतीने शासनाचा निषेध करण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ‘हुतात्मा’चे माजी संचालक एन. के. पाटील होते. यावेळी हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष भगवान पाटील, संचालक लालासाहेब लोंढे, हुतात्मा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दिनकर बाबर, संचालक बी. टी. घारे, हिंदुराव पाटील, हुतात्मा बँकेचे संचालक आनंदराव थोरात, विकास खराडे, उद्योजक विक्रम पाटील, प्रदीप पाटील, विजय पाटील, के. व्ही. भोईटे, दादासाहेब गावडे उपस्थित होते. याप्रसंगी सुभाष देशमुख यांनी आभार मानले. आष्टा : चांदोली धरणग्रस्तांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी दिवसभर आष्टा शहर व परिसरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे व्यवहार बंद ठेवून पाठिंबा दिला.आष्टा शहर शिवसेनेचे माजी अध्यक्ष हणमंतराव सूर्यवंशी, अमित मालगावे यांनी आष्टा बंदची हाक देत शहरातून मोटारसायकल रॅली काढली. सकाळी १0 वाजल्यापासून सायंकाळी पाचपर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. यावेळी अर्जुन हिरुगडे, विकास खंबाळे, अकबर वारुसे, सागर खाडे, शशिकांत हालुंडे, राहुल घसघसे, सचिन पाटील, अमृत मोटे, गोरक्ष गडदे यांच्यासह आष्टा परिसरातील धरणग्रस्त उपस्थित होते.इस्लामपूर : पुनर्वसनाचा प्रश्नावर वारणावती परिसरात ठिय्या मारून बसलेल्या चांदोली धरण व प्रकल्पग्रस्त आंदोलकांनी शुक्रवारी दुपारी येथील पंचायत समितीच्या आवारात शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच दक्षता घेतल्याने त्यांचा हा प्रयत्न फसला. यावेळी प्रकल्पग्रस्त आंदोलकांनी शहरात मोटारसायकलची रॅली काढली. त्यानंतर पंचायत समिती आवारात निदर्शने झाली. (वार्ताहर)आज वाघवाडीत महामार्ग रोखणार : गौरव नायकवडी धरणग्रस्तांच्या प्रश्नावर निद्रिस्त शासकीय यंत्रणेला जागे करण्यासाठी आंदोलनाची तीव्रता वाढवून शनिवारी वाघवाडी (ता. वाळवा) येथील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखणार, असा इशारा वारणा धरणग्रस्त संग्राम संघटनेचे नेते गौरव नायकवडी यांनी दिला. शुक्रवारी आंदोलनाचा पाचवा दिवस होता. पलूसच्या मानसिंग बॅँकेचे संस्थापक जे. के. बापू जाधव, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुशांत पाटील, दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मधुकर वायदंडे यांसह लाभक्षेत्रातील विविध नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. आंदोलनस्थळी ५० धरणग्रस्त मुस्लिम बांधवांनी नमाज पडून, शासनाला व अधिकाऱ्यांना धरणग्रस्तांची कणव येऊन सुबुद्धी सुचावी, अशी प्रार्थना केली. जिल्हा परिषदेचे सदस्य सम्राट महाडिक यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला.
शिराळा पश्चिम, वाळवा परिसरात उत्स्फूर्त बंद
By admin | Published: January 16, 2016 12:10 AM