चंदगड / माणगाव :
कडलगे ते ढोलगरवाडी दरम्यानच्या हांज ओढ्यावर आलेल्या पुराच्या पाण्यात दुचाकीस्वार वाहून गेला. अभिजित संभाजी पाटील (वय २७, रा. नागरदळे, ता. चंदगड) असे दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. गुरुवारी (२२) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवर मागे बसलेल्या शशिकांत पाटील याला वाचविण्यात यश मिळाले.
मुसळधार पावसामुळे कडलगे- ढोलगरवाडी दरम्यानच्या ओढ्यावर पाणी आले आहे. त्यामुळे कडलगेचे पोलीस पाटील राजेंद्र पाटील यांनी ओढ्याजवळील रस्त्यावर लाकडाचे ओंडके टाकून रस्ता बंद केला होता. मात्र, काही हौशी प्रवाशांनी लाकडे काढल्यामुळे वाहतूक सुरू केली होती.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अभिजित पाटील व शशिकांत पाटील हे दोघे ढोलगरवाडीकडून नागरदळेकडे दुचाकीवरून (स्प्लेंडर क्रमांक एमएच ०९, एफयू १६१९) जात होते.
दरम्यान, रस्त्यावर पाणी असल्याने अंदाज चुकला व दुचाकीसह दोघेही पाण्यातून वाहून गेले. मात्र, दुचाकी ओढ्याच्या बाजूला अडकल्याने आणि त्या दुचाकीला पकडून धरलेल्या शशिकांतला नागरिकांनी वाचविले. मात्र अभिजित पाण्यातून पुढे वाहून गेला. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
जोरदार पाऊस, पाण्याचा वेगवान प्रवाह व संध्याकाळ झाल्यामुळे बचाव कार्य थांबविण्यात आले असून उद्या (शुक्रवारी, २३) पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.
..अन् काळाने झडप घातली
अभिजित हा एअर इंडियामध्ये नोकरीला आहे. तो सध्या सुट्टीवर आला होता. सुट्टी संपवून उद्या (शुक्रवारी) तो ड्युटीवर हजर होणार होता. दरम्यान, सुंडी येथील धबधबा पाहण्यासाठी तो आपल्या मित्रासमवेत गेला होता. धबधबा पाहून गावी परतत असताना काळाने त्याच्यावर झडप घातली.
- अभिजित पाटील : २२०७२०२१-गड-१३