बालिंगा येथील साडेतीन कोटी रुपयांचे दागिने अपहार प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : बालिंगा येथील सराफ संशयित सतीश उर्फ संदीप सखाराम पोवाळकर (वय ३४, रा. कणेकरकर नगर), व अमोल अशोक पोवार (वय २७, सातार्डे, ता. पन्हाळा) या दोघांनी जादा व्याजाचे अमिष दाखवून सुवर्ण ठेव योजना भिशी सुरू केली. त्यातून ३९३ दागिने मालकांचे ४ किलो ४८३ ग्रॅम सोन्याचे दागिने विविध वित्तीय संस्थांमध्ये गहाणवट ठेवून ३ कोटी ५३ लाख ७ हजार ६४४ रुपयांचा अपहार केला. यापैकी करवीर पोलिसांनी ३० तोळे दागिने, वाहन, प्लाॅट असे ३४ लाख १८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल शुक्रवारी जप्त केला.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बालिंगा (ता. करवीर) येथे अंबिका ज्वेलर्सच्या माध्यमातून संशयित पोवाळकर व पोवार यांनी २०१३ साली सुवर्ण ठेव योजना भिशी सुरू केली. यात ३९३ दागिने मालकाचे दागिने स्वत:कडे गहाण ठेवून घेऊन त्या बदल्यात दागिने मालकांना व्याजाने पैसे दिलेले आहेत. दागिने मालकांकडून प्राप्त गहाण सोने, संशयितांनी मूळ मालकांना न कळविता परस्पर त्यांचा विश्वासघात करीत विविध वित्तीय संस्था, बँकांमध्ये तारण ठेवले आहेत. त्यावर सुवर्ण कर्ज काढलेले आहे. झडतीमध्ये संशयितांकडून पोलिसांनी ९८ सोने तारण पावत्या जप्त केल्या. याशिवाय घरझडतीमध्ये २१ विमा पावत्याही जप्त केल्या. त्यात संशयितांनी एकूण ४ किलो ४८३ ग्रॅम सोन्याचे दागिने तारण ठेवून त्या बदल्यात कर्ज काढून अपहार केला आहे. ही रक्कम एकूण ३ कोटी ५३ लाख इतकी आहे. पोलिसांनी तपासादरम्यान शुक्रवारी संशयितांकडून १७ लाख ५ हजाराचे २९.४ तोळे सोन्याचे दागिने, २ किलो ८०९ ग्रॅम चांदीचे दागिने, वस्तू (किंमत १ लाख ९३ हजार ७००) व दुकान झडतीतून ४.२६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, आणि ३० तोळे दागिने व नागदेववाडी (करवीर) येथील १० लाख रुपये किमतीचा प्लाॅट जप्त करण्यात आला. याशिवाय त्यांच्याकडून एक चारचाकी, दोन मोटारसायकल, दोन मोपेड असा ५ लाख २० हजारांचा असा एकूण ३४ लाख १८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यातील दुसरा संशयित अमोल पोवार यास अटक करण्यात आली असून शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास २८ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. याबाबतचा तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर व त्यांचे सहकारी कर्मचारी जालिंदर पाटील, रवींद्र पाटील, संभाजी रणदिवे, योगेश शिंदे हे करीत आहेत.
चौकट
साक्षीदारांचीही फसवणूक
संशयितांनी साक्षीदारांकडून ३० तोळे सोने स्वत: गहाण ठेवून घेऊन, तेही सोने साक्षीदारांना न कळविता परस्पर दोन खातेदारांकडे पुन्हा गहाण ठेवून त्यांचेकडून १७ लाख ५ हजार रुपयांच्या रकमेचा अपहार केला आहे.
फोटो : २५०६२०२१-कोल-अमोल पोवार (संशियत आरोपी)