सदाशिव मोरे
आजरा : आजरा तालुक्यातील उचंगी धरणाच्या घळभरणीचे काम धरणग्रस्तांनी गनिमीकाव्याने येऊन बंद पाडले. पुनर्वसन न झाल्यामुळे धरणग्रस्त आक्रमक झाले होते. घळभरणीसाठी धरणस्थळावर आणलेल्या सर्व मशीनरी धरणग्रस्तांनी पिटाळून लावल्या.
त्यानंतर धरणग्रस्तांची बैठक झाली. बैठकीत पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यासोबत जो पर्यंत बैठक होत नाही तोपर्यंत धरणाचे काम बंदच राहील. आधी पुनर्वसन मगच धरण हा कायदा असतानाही तो पायदळी तुडवून धरणाचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा. पोलिसी खाक्या दाखवून धरणाची घळभरणी सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे परिणाम वाईट होतील असा इशाराही यावेळी दिला.उचंगीचे धरणग्रस्त चाफवडेतून मोर्चाने धरणस्थळावर आले. मोर्चात धरणग्रस्तांच्या एकजुटीचा विजय असो, आधी पुनर्वसन मगच धरण, पोलिसी खाक्या दाखवून काम करणाऱ्या शासनाचा धिक्कार असो यासह विविध घोषणा देण्यात आल्या. मोर्चामध्ये महिला वर्ग मोठ्या संख्येने आक्रमक झालेल्या दिसत होत्या.
धरण स्थळावर पाटबंधारे विभाग जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता विनया बदामी, उपविभागीय अभियंता विजय राठोड यांनी धरणग्रस्तांशी चर्चा केली. मात्र धरणग्रस्त पुनर्वसनासाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबतच्या बैठकीवर शेवटपर्यंत ठाम राहिले. धरणग्रस्त आजच्या मोर्चात काठ्या घेऊनच सहभागी झाले होते. त्यामुळे मशिनरीच्या चालकांनी आपली मशीन तातडीने धरण स्थळावरून हलविले. यावेळी धरणग्रस्तांनी काही चालकांना काठीचा प्रसादही दिला.