- भीमगोंडा देसाई कोल्हापूर - सीपीआरमधील अधिष्ठाता कक्षासमोरील दूधगंगा इमारतीसमोर तलवारीसह मिळालेली दुचाकी लक्ष्मीपुरी पोलिसांनी शुक्रवारी जप्त केली. या प्रकरणी पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतील दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुचाकीला तलवार अडकून तिघेजण सीपीआरच्या मुख्य प्रवेशव्दारातून प्रवेश केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. यामुळे पोलिस दुचाकीवरील तिसऱ्याचा शोध घेत आहेत. तलवार कशासाठी घेवून आले होते, काय उद्देश होता, कोणाचा गेम करण्याचा प्लॅन होता का ? या अंगाने पोलिस तपास करीत आहेत. सीपीआरमधील सुरक्षा रक्षक आणि दक्ष नागरिकामुळे वेळीच दुचाकी आणि तलवार पोलिसांना मिळाली.
पोलिस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सीपीआरच्या मुख्य प्रवेशव्दारातून दुपारी तीनच्या सुमारास तिघा तरुणांनी एकाच दुचाकीवरून प्रवेश केला. या दुचाकीला पांढऱ्या प्लॉस्टिकच्या पोत्यात तलवार होती. ही दुचाकी दूधगंगा इमारतीसमोर लावली. तेथील सुरक्षारक्षक आणि काही दक्ष नागरिकांना संशय आल्याने दुचाकीवरील पोत्याला हात लावून पाहिले. त्यावेळी त्यामध्ये तलवार असल्याचे समोर आले. काहीवेळातच बघ्यांची गर्दी झाली. म्हणून सुरक्षारक्षकाने तलवारीसह दुचाकी काही अंतरावर नेवून लावली. लक्ष्मीपुरी पोलिसांना यासंबंधीची माहिती दिली. पोलिस तातडीने येवून तलवारीसह दुचाकी जप्त केली.
दरम्यान, काही वेळानंतर दुचाकीवरील दोन तरूण दूधगंगा इमारतीसमोर आले. त्यांनी आपण लावलेल्या दुचाकीचा शोध घेवू लागले. त्यांना दुचाकी सापडेना. म्हणून ते दोघेही करवीर पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीची फिर्याद देण्यासाठी गेले. आधीच तिथे लक्ष्मीपुरी पोलिसांनी सांगून ठेवल्यामुळे त्या दोघांना ताटकळत ठेवले. त्यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत तलवार कशासाठी आणली होती, हे स्पष्ट झाले नाही.