राम मगदूम
गडहिंग्लज : (कोल्हापूर)
नाग म्हटलं तरी उरात धडकी भरते. भूल न देता नागावर शस्त्रक्रिया करणे म्हणजे जीवाशी खेळण्याचा प्रकारच होय. परंतु, पशुवैद्य डॉ.वरूण धूप यांनी कौशल्यपणाला लावून ७ फूट लांबीच्या नागाला २४ टाके घालून जीवदान दिले. सध्या हा नागराज कोल्हापूरातील वनविभागाच्या देखरेखीखाली पेटीत ऐटीत डोलत आहे.
दोन दिवसापूर्वी दाभेवाडी येथील अमर मुरकुटे यांच्या काजू कारखान्याच्या परिसरात विषारी नाग आढळून आला. त्यामुळे त्यांनी सर्पमित्र राहूल भोईटे व सूरज भोसले यांना तातडीने बोलावून घेतले. वनविभागाला माहिती देवून त्यांनी दाभेवाडीकडे धाव घेतली.
वनअधिकारी रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत राहूल व सूरज यांनी मोठ्या शिताफीने नागाला पकडले. त्यावेळी नागाच्या छातीजवळची कातडी सोललेली निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर औषधोपचार करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात धूप यांना माहिती देताच त्यांनी जखमेवर हळदपूड टाकून सापाला येथील दिवंगत स्वातंत्र्यसैनिक शंकरराव धूप स्मृती पशु काळजी केंद्रात आणण्यास सांगितले.
धूप यांनी योग्य ती खबरदारी घेवून वनअधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महेश कुंभार, स्वप्निल म्हेत्री, रोहित कांबळे, राहूल व सूरज यांच्या सहकार्याने त्या सापावर शस्त्रक्रिया केली. तब्बल २४ टाके घालून त्यांनी सापाची सोललेली कातडी पूर्ववत जोडली. संसर्ग होवू नये म्हणून त्वतेच औषधे सोडली आणि इंजेक्शनद्वारे प्रतिजैविकेही दिली. त्यामुळे नागोबा दोन दिवसात ठणठणीत बरे झाले आहेत. लवकरच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.‘धूप यांची भूतदया’
डाॅ. धूप यांनी मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार करून आजअखेर जखमी ५ वानरे, ३ घुबड, २ उदमांजर व गरूडाच्या पिलाला जीवदान दिले आहे. त्याची नोंद घेवून आजऱ्याच्या वनअधिकारी स्मिता डाके यांनी खास मानपत्र देवून त्यांचा सन्मान केला आहे.फोटो : गडहिंग्लज येथे डॉ. वरूण धूप यांनी नागावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यांना सर्पमित्र राहूल भोईटे, सूरज भोसले, स्वप्निल म्हेत्री, रोहित कांबळे यांनी सहकार्य केले.