कोल्हापूर ते माणगाव आंबेडकर सन्मान रॅली, इंडिया आघाडीचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 15:40 IST2024-12-27T15:38:50+5:302024-12-27T15:40:43+5:30
११ फुटी उंचीचा पुतळा..

कोल्हापूर ते माणगाव आंबेडकर सन्मान रॅली, इंडिया आघाडीचा पुढाकार
कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ येत्या रविवारी (दि. २९ डिसेंबर) इंडिया आघाडीच्यावतीने कोल्हापूर ते माणगाव अशी दोन हजार मोटरसायकलस्वारांची रॅली काढण्याचे नियोजन गुरुवारी येथे बैठकीत झाले. सकाळी ९.३० वाजता ही रॅली दसरा चौकातील शाहू महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू होईल. रॅलीचा समारोप डॉ. आंबेडकर यांना माणगाव येथे अभिवादन करून करण्यात येणार आहे.
संसदेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अवमानकारक जे वक्तव्य केलेले होते, त्याचा निषेध बिंदू चौकात धरणे आंदोलन करून करण्यात आला. तेव्हाच अशी रॅली काढण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्याच्या नियोजनासाठी बैठक झाली. निमंत्रक आर. के. पोवार अध्यक्षस्थानी होते. त्यांनी खासदार शाहू छत्रपती व काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढणार असल्याचे सांगितले.
या सन्मान रॅलीमध्ये जास्तीत जास्त संख्येने मोटारसायकली सामील झाल्या पाहिजेत, त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे ठरले. जिल्ह्यातील संविधानप्रेमी सर्व आम जनतेने दसरा चौकात मोटारसायकलसह उपस्थित रहावे, असे आवाहन आघाडीच्या वतीने करण्यात आले. बैठकीस विजय देवणे, सचिन चव्हाण, दिलीप पवार, उदय नारकर, सुनील मोदी, व्यंकाप्पा भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
११ फुटी उंचीचा पुतळा..
रॅलीमध्ये मार्गावरील सर्व गावातील नागरिक सहभागी होणार आहेत. रॅलीच्या सुरुवातीला आंबेडकर यांचा ११ फूट उंचीचा पुतळा असणार आहे. माणगाव येथे डॉ. आंबेडकर यांचा सन्मान करणारा ठराव मांडून या रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे.