विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारीच्या बाबतीत भाजप बहुमतात व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट अल्पमतात असल्याची सद्य:स्थिती आहे. जिल्ह्यातील निम्म्या जागा भाजपला मिळाव्यात, अशी मागणी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांच्याकडे भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी झालेल्या मेळाव्यात केली. म्हणून ‘लोकमत’ने नेमकी वस्तुस्थिती तपासून पाहिली. त्यानुसार भाजपकडे त्यांच्या स्वत:च्या ५, मित्रपक्ष जनसुराज्य पक्षाच्या २ अशा दहापैकी एकूण ७ जागा राहू शकतात. शिंदे गटाकडे तीन जागा राहतील असे चित्र दिसते.लोकसभा व विधानसभा निवडणुकीस अजून किमान १६ महिन्यांचा अवधी आहे; परंतु भाजपने त्यासाठीच्या जोडण्या लावण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे. मागच्या पंधरवड्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व आता सिंदिया यांचे दौरे त्यासाठीच झाले आहेत. यापूर्वी केंद्रीय मंत्री एस. पी. सिंह बघेल यांचाही दौरा त्यासाठीच झाला होता. या दोन्ही निवडणुका एकत्रच घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तसे झाल्यास शिवसेनेतील बंडखोरी, महाराष्ट्रातील राजकारण हे सारे विषय बाजूला पडून राष्ट्रीय प्रश्र्नावर निवडणूक लढवली जाऊ शकते व भाजपला तेच हवे आहे.जिल्ह्यातील कोल्हापूर उत्तर व इचलकरंजी मतदार संघात भाजपअंतर्गत उमेदवारीसाठी रस्सीखेच आहे. उत्तरच्या पोटनिवडणुकीत भाजपने ही जागा लढवली व ९२ हजार मते घेतली. परंतु शिंदे गटातून माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनीही या जागेसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यांचा प्रत्येक कार्यक्रम पुन्हा आमदार होण्यासाठीच सुरू आहे. विधान परिषदेवर संधी मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. तसे झाल्यास सत्यजित कदम यांचा मार्ग मोकळा होईल. कदम मात्र पराभूत झाल्यानंतर पुन्हा जिंकण्यासाठी काही बदल करताना दिसत नाहीत. आपला पराभव हा स्वत:च्या नव्हे तर जनतेच्या चुकांमुळे झाला असल्याचा त्यांचा आजही समज दिसतो.इचलकरंजीत प्रकाश आवाडे यांनी स्वतंत्र निवडणूक लढवून ही जागा जिंकली व लगेच भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांचा या जागेवरील दावा प्रबळ आहे. माजी आमदार सुरेश हाळवणकर हे या मतदार संघातून दोन वेळा निवडून आले आहेत. त्यांचे राजकीय पुनर्वसन कसे करणार हा कळीचा मुद्दा आहे. आवाडे यांच्या घरात लोकसभेची उमेदवारी देऊन विधानसभा हाळवणकर यांना द्यावी अशीही मागणी अधूनमधून पुढे केली जाते. आवाडे यांच्या दृष्टीनेही लोकसभा की विधानसभा यावरही यातील राजकारण अवलंबून आहे.
करवीरमध्ये चंद्रदीप नरके हे अजूनही तळ्यात-मळ्यात आहेत. त्यांची नेहमीच ‘ठंडा करके खाओ’ अशी भूमिका राहिली आहे. त्यामुळे शिंदे गट की भाजप असे दोन्ही पर्याय त्यांच्यासाठी खुले आहेत. अन्य मतदार संघातील उमेदवारांमध्ये फारसे बदल संभवत नाहीत.
कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेचे भाजप व मित्रपक्षांचे संभाव्य उमेदवारकोल्हापूर उत्तर : सत्यजित कदम की राजेश क्षीरसागरइचलकरंजी : प्रकाश आवाडे की सुरेश हाळवणकरकोल्हापूर दक्षिण : शौमिका महाडिककागल : समरजित घाटगेचंदगड : शिवाजीराव पाटील
भाजपचे मित्रपक्षशाहूवाडी : विनय कोरे (जनसुराज्य)हातकणंगले : अशोकराव माने (जनसुराज्य)
बाळासाहेबांची शिवसेनाराधानगरी : प्रकाश आबिटकरशिरोळ : राजेंद्र यड्रावकरकरवीर : चंद्रदीप नरके
लोकसभेला दोन्ही उमेदवार भाजपचेच शक्यकोल्हापुरातून खासदार संजय मंडलिक व हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने हे दोघेही मोदी व कमळ या दोन्ही गोष्टींसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडात सहभागी झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही जागांवर मुख्यमंत्र्यांनी भाजपकडून कमिटमेंट घेतली असेल तर याच दोघांना उमेदवारी मिळू शकते. दोन्ही खासदारांनीही त्यासाठीच देव पाण्यात घातले आहेत. एकदा भाजपची उमेदवारी मिळाली की यांना निवडून आणणे ही भाजपची गरज बनते. पक्ष आर्थिक ताकदीपासून प्रचाराला नेते पाठवण्यापर्यंत आणि बूथपर्यंतच्या जोडण्या लावण्यापर्यंत उपयोगी पडतो. शिंदे गटाची नवी ढाल-तलवार त्यांना त्यासाठी उपयोगी ठरणारी नाही हे त्यांना चांगलेच कळून चुकले आहे. सद्य:स्थितीत हेच दोघे भाजपचे उमेदवार असतील असे चित्र आहे.