कोल्हापूर- कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून माजी मंत्री सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक गट शुक्रवारी रात्री बिंदू चौकात एकमेकांना आव्हान देत आमने-सामने आले. त्यामुळे बिंदू चौकाने सुमारे दोन तास राजकीय खुन्नस व कमालीचा तणाव अनुभवला.
कोणत्या क्षणी काय होईल हे सांगता येत नव्हते असं वातावरण तेथे होते.साऱ्या कोल्हापुरातील भीमसैनिक भीमरायांना अभिवादन करण्यासाठी बिंदू चौकात एकवटले होते. त्यांना कार्यकत्यांची आणि पोलिसांची पळापळ पाहून नेमके काय सुरू आहे हे समजले नाही.कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी साखर साखर कारखान्याच्या निवडणुकीत टोकाची ईर्ष्या जिल्ह्याने अनुभवली. परंतु एकमेकांना आव्हान देत संघर्षाची ही पहिलीच वेळ असावी.
घडले ते असे या निवडणुकीत विरोधी आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरल्यावर आमदार सतेज पाटील यांनी महाडिक भ्याले म्हणून रडीचा डाव खेळले, अशी टीका केली. तेव्हापासून त्यांच्या प्रचाराचा रोख त्याभोवतीच राहिला, त्याचे पडसाद सत्तारूढ महाडिक गटाच्या प्रचार प्रारंभ मेळाव्यात शुक्रवारी सकाळी आमदार अमल महाडिक यांनी तुम्ही सभेत अशी भाषणे केली जातात. त्यामुळे त्यास सुरुवातीला कोणी गांभीर्याने घेतले नाही. परंतु दुपारी तीन वाजता त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता उरले फक्त चार तास अशी पोस्ट पुन्हा व्हायरल केली. त्यानंतर सतेज पाटील गटाने त्यास प्रत्युत्तर देण्याची तयारी केली. लगेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सात वाजता अजिंक्यतारा येथे एकत्र जमण्याचे आवाहन केले.
कोल्हापूर जिल्ह्यासह शेजारच्या गावांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले. लगेच ढोल ताशा वाजू लागला. त्यांनीही सोशल मीडियावर वाघ येतोय अशी पोस्ट व्हायरल केली. तोपर्यंत महाडिक समर्थक कार्यकर्तेही बिंदू चौकात जमू लागले. रात्री साडे सातच्या सुमारास सिद्धार्थनगरातील भीमजयंती मिरवणूक बिंदू चौकात आली होती. बिंदू चौक निळा सागर बनला होता. त्याचवेळी देवल क्लबकडून अमल महाडिक, सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, आदी प्रमुख कारागृहाच्या कमानीजवळ आले. तिथे आल्यानंतर महाडिक यांनीही भीमरायाला अभिवादन केले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.
कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेतले.मी सतेज पाटील यांना बिंदू चौकात या असे आव्हान दिले होते. परंतु ते आले नाहीत. ते येईपर्यंत आमची येथे थांबण्याची तयारी आहे. असं त्यांनी जाहीर केले. माध्यमांशी बोलल्यानंतर ने बिंदू चौक पार्किंगकडील बाजूस थांबून मग निघून गेले. तोपर्यंत आमदार ऋतुराज पाटील तिथे आले नव्हते. कॉंग्रेसचे कार्यकर्ते मात्र मटण मार्केटजवळ जमले होते. तोपर्यंत ऋतुराज हे दसरा चौकात आल्याचे कळताच पळत तिकडे गेले. दसरा चौकात ऋतुराज पाटील यांना उचलून घेतले. बावड्याचा वाघ आलाय अशा घोषणा सुरू झाल्या, त्यानंतर सगळे कार्यकर्ते बिंदू चौकात आले. लक्ष्मीपुरी ते बिंदू चौकापर्यंत दोन ठिकाणी पोलिसांनी व्हॅन आडव्या लावून रस्ते अडवले होते.
भान बाळगा...
ही निवडणूक साखर कारखान्याची आहे. सभासद सूत्र आहेत. त्यांच्या हातात मतांचा अधिकार आहे. त्यामुळे ते जे योग्य आहे त्याचा निकाल देतील; परंतु नेत्यांनीच संघर्षाची पातळी सोडली तर त्याचे पडसाद गावोगावी उमटतात. त्यातून कार्यकत्यांचा बळी जातो. त्यामुळे प्रचारात किती खाली उतरायचे, याचे भान दोन्ही पॅनेलच्या नेत्यांनी बाळगणे गरजेचे आहे.
संघर्ष टोकाला
राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही एका कारखान्याची आहे. परंतु त्यामध्ये दोन राजकीय घराण्यामधील संघर्ष त्यामध्ये उफाळला आहे. त्याची लोकसभेच्या २०१४ च्या सुरुवात कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील २००९ च्या विधानसभा निवडणुकीपासून झाली आहे. पुढे निवडणुकीत सतेज पाटील -महाडिक यांचे मनोमिलन झाले; परंतु ते फार काळ टिकले नाही. विधानसभेला सतेज पाटील विरुद्ध भाजपचे अमल महाडिक यांच्यात लढत झाली तेव्हापासून सुरु झालेला हा संघर्ष आता बिंदू चौकात एकमेकांना बोलावण्यापर्यंत जावून पोहोचला आहे.
मी एकदा नव्हे तर तीनदा म्हणतो आहे की महाडिक भ्याले आहेत. आम्हाला आव्हान दिले होते की बिंदू चौकात या तर तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी थांबायला हवे होते. परंतु तुम्ही पळून गेला आहात.- ऋतुराज पाटील, आमदार विरोधी आघाडीचे नेते
"महाडिक भ्याले, असे म्हणणाऱ्या सतेज पाटील यांना महाडिक भिणारे नाहीत हे दाखवण्यासाठीच मी बिंदू चौकात आलो, मात्र सतेज पाटील हेच भ्याले. ते आले नाहीत. राजाराम कारखान्यात आमचा विजय निश्चित आहे.-अमल महाडिक, माजी आमदार, सत्तारुढ आघाडीचे नेते