चंदगड : बुलेट गाडी घेण्यासाठी माहेरहून १ लाख रुपये आणावेत म्हणून मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून राजगोळी बुद्रुक येथील विवाहितेने सोमवारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे पती, सासू, सासरा व आणखीन दोघांवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निकिता हणमंत पाटील हिच्या आत्महत्येला जबाबदार धरून पती हणमंत धाकलू पाटील, सासू बाळाबाई धाकलू पाटील, सासरा धाकलू कल्लाप्पा पाटील (सर्व रा. राजगोळी बुद्रुक), नणंद चंद्रभागा रामा कोकितकर व तिचा पती नागोजी कोकितकर (दोघेही रा. मणगुत्ती, ता. हुक्केरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. निकिता ही मूळची सुरुते गावची असून तिचा राजगोळी बुद्रुक येथील हणमंत याच्याशी गेल्यावर्षी मे महिन्यात विवाह झाला होता. पण सासरच्या मंडळींकडून कायम तिचा छळ केला जायचा. तसेच बुलेट गाडी घेण्यासाठी माहेरहून १ लाख रुपये आण म्हणून तिला वरचेवर माराहाण केली जायची. त्याला कंटाळून सोमवारी तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे तिच्या मत्यूस जबाबदार धरून निकिताचे वडील फिर्यादी गजानन रघुनाथ पाटील यांनी चंदगड पोलिसात तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार पती, सासू, सासरा, नणंद व तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Kolhapur: बुलेटसाठी सासरी छळ; विवाहितेने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 2:31 PM