बाजीराव जठार
वाघापूर : श्रीक्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड)येथील मरगुबाई मंदिराशेजारी असलेल्या बाळूमामांच्या बक-यांच्या तळावर मोठ्या भक्तीमय वातावरणात लेंढीपूजन व बकरी भुजविण्याचा कार्यक्रम भंडार्याच्या उधळणीत व ढोल कैताळाच्या गजरात पार पडला. सद्गुरु बाळूमामांनी दीपावली पाडव्याच्या दिवशी आपल्या मेंढ्यांची पूजा करण्याची प्रथा सुरु केली होती. ती प्रथा भाविकभक्तांनी आजही जोपासली आहे.
प्रारंभी बाळूमामा मंदिरातून देवस्थानचे मानकरी राजनंदिनी धैर्यशील भोसले यांच्याहस्ते ढोल, कैताळाच्या वाद्यात भंडारा आणण्यात आला. मरगुबाई मंदिर परिसरात बाळूमामांच्या बकऱ्यांच्या लेंढ्याची रास करण्यात आली. या राशीचे विधिवत पूजन करण्यात आले. विविध प्रकारच्या फुलांनी रास सजवण्यात आली होती. सभोवती गवळण्या घालण्यात आल्या होत्या. बाळूमामांच्या कळपातील बकरी भुजवण्यासाठी (पळवणे) बकरी आणण्यात आली.
सुवासिनींनी बकऱ्यांचे पूजन केले.बाळूमामांच्या भंडाऱ्याची राशीवर उधळण करण्यात आली. यावेळी दूध ऊतू जाण्याच्या कार्यक्रमाकडे दूध कोणत्या दिशेला उतू जाते हे पाहण्यासाठी सगळ्या भाविकांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. ही प्रथा बाळूमामांनी सुरू केली होती. ज्या दिशेला हे दूध उतू जाईल त्या दिशेला पाऊस, पीकपाणी उत्तम राहाते, अशी भावना लोकांमध्ये आहे. यावर्षी उत्तर बाजूला दूध बाहेर गेल्याने हा भाग सुजलाम सुफलाम होणार हे भाकित या प्रथेतून सांगण्यात आले.
बाळूमामांनी सुरू केलेल्या बकरी पूजन व बकरी भुजवणे या कार्यक्रमास महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातून हजारो भाविक उपस्थित होते. या प्रसंगी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. विविध जाती धर्मातील भक्तांनी आणलेला दिवाळीचा फराळ भक्तांना वाटप करण्यात आला. सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारा आदमापूरची दिवाळी पाडवा यात्रा उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाली. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास राजनंदिनी धैर्यशील भोसले, शिवराज नाईकवडे, बग्गा नंबर सहाचे कारभारी नागाप्पा मिरजे, बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय पाटील,गोकुळचे माजी सदस्य दिनकरराव कांबळे, सर्व मेंढके, विठ्ठल पुजारी, सर्व सेवक,भक्त व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.