कोल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवार अपात्रतेचा निकाल प्रादेशिक साखर सहसंचालकांनी कायम ठेवला. विरोधी गटाचे ३० व एक इतर असे ३१ उमेदवार अपात्रतेचा निकाल सामवारी दिला. याविरोधात विरोधी आमदार सतेज पाटील गट उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. ‘राजाराम’ साखर कारखान्याचा सत्तासंघर्ष टोकाला पोहोचला आहे. शह-काटशहाचे राजकारण उफाळले आहे. कारखान्याच्या पोटनियमाचे उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी नीलकंठ करे यांनी ३१ इच्छुक उमेदवारांना अपात्र ठरविले होते. संबंधितांनी कारखान्याशी केलेल्या कराराप्रमाणे ऊस पुरवठा केला नसल्याचा ठपका ठेवला आहे. या ३१ पैकी ३० इच्छुक उमेदवार हे आमदार सतेज पाटील यांच्या गटाचे आहेत. यामध्ये कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांच्यासह काही दिग्गजांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक अशाेक गाडे यांच्याकडे अपील केली होती. त्यावर दोन दिवस सुनावणी झाल्यानंतर रविवारी रात्री उशिरा निकालपत्रे संबंधितांना देण्यात आली. यामध्ये सर्वच्या सर्व ३१ उमेदवारांनी दाखल केलेले अपील फेटाळत निवडणूक निर्णय अधिकारी नीलकंठ करे यांचा निर्णय कायम ठेवला. विरोधी आघाडीने उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी केली आहे. आज, मंगळवारी न्यायालयात दाखल करून दुपारपर्यंत सुनावणी घेता येते का? याची चाचपणी विरोधी गट करीत आहे. कारखान्यासाठी २३ एप्रिलला मतदान होत आहे.
दोन्ही पॅनेलची घोषणाउद्या माघारीची मुदत उद्या, बुधवारपर्यंत आहे, त्यामुळे सत्तारूढ व विरोधी पॅनेलची घोषणा उद्या सकाळी अकरा वाजताच होणार हे निश्चित आहे.
रात्री बारानंतर निकालअपील दाखल केल्यानंतर दहा दिवसांत निकाल देणे कायद्याने बंधनकारक आहे. अपीलवर दोन्ही बाजूंचे म्हणणे बुधवार व गुरुवारी ऐकून घेतले. त्यानंतर निकाल तयार करून रविवारी रात्री बारानंतर निकाल दिला.