कोल्हापूर : ‘महाडिकसाहेब, ‘राजाराम’ तुम्ही व्यवस्थित चालवलाय, आम्ही रिटायर व्हायला आलो, आता तरी परमनंट करा’, ‘बंटीसाहेब, माने सरांचे सगळे ऐकू नका, हीच ताकद कारखान्यासाठी लावली, तर ‘राजाराम’ गतीने सुरू होईल, अशा भावना सभासदांनी चिठ्ठीद्वारे व्यक्त केल्या आहेत.अलीकडे नेते मंडळींचे सोईचे व गृहीत धरण्याचे राजकारण वाढले आहे. एखाद्या निवडणुकीत कार्यकर्त्यांची मते काय आहेत, याची विचारपूसही केली जात नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये खदखद असते, मताद्वारे ही खदखद व्यक्त केली जाते. त्याचबरोबर, चिठ्ठीद्वारेही राग व्यक्त केला जातो. ‘राजाराम’ कारखान्याच्या निवडणुकीत टाेकाची इर्षा पाहावयास मिळाली, व्यक्तिगत पातळीवर झालेल्या आरोप-प्रत्यारोपाने सभासदांच्या मनातही चीड निर्माण झाली होती. ही चीड चिठ्ठीद्वारे मांडण्याचा प्रयत्न काही सभासदांनी केला आहे.एका सभासदाने ‘महाडिकसाहेब कारखाना व्यवस्थित सुरू आहे, पण कर्मचाऱ्यांची लग्ने होत नाहीत. रिटायरला आलो, तरी परमनंट नाही.’ तर ‘बंटीसाहेब, तुम्ही सर्जेराव माने यांचे सगळे ऐकू नका, एक दिवस तेही तुमचा विश्वासघात करतील,’ असा टोला लगावला आहे. शिरोली पुलाची, कसबा तारळे येथील काही सभासदांनी स्थानिक नेत्यांपासून सावध राहण्याचा सल्ला अमल महाडिक व सतेज पाटील यांना दिला आहे.
बोंबलताना हातही जाईल...कारखान्याचे अध्यक्षपदी आपण भूषवलं, पण सरड्याप्रमाणे रंग बदलून आपण पुन्हा अध्यक्ष होणार नाही. हा प्रकार म्हणजे बापच्या बाप गेला आणि बोंबलताना हातही गेला, अशी अवस्था आपली होईल, अशी तिखट प्रतिक्रिया एका सभासदांनी व्यक्त केली आहे.
निष्ठा फाट्यावर, मतदान गठ्ठ्यावरनिष्ठा, प्रामाणिकपणाला मारले फाट्यावर, मतदान होतंय नोटांच्या गठ्ठ्यावर. कोणी दहा, कोणी पाच, किती वाटले नाही मोजतात. महाडिक साहेब, कुठला पायंडा पडतोय, याचा यापुढे तरी विचार करा, अशी खंतही एका सभासदाने व्यक्त केली आहे.
मोल घेताना गुदगुल्या...सभासदांना मताचे मोल घेताना होत आहेत गुदगुल्या, निवडणुकीनंतर कामासाठी त्यामुळे जाताना काढाव्या लागतील नाकदुऱ्या, असा इशाराही एका सभासदाने दिला आहे.