कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवात बुधवारी मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाईच्या मुखकमलापर्यंत येऊन पोहोचली. किरणोत्सवाचा ठरलेला कालावधी संपल्यानंतर सूर्यकिरणे देवीच्या चेहऱ्यापर्यंत गेल्याने अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळा सात दिवसांचा असावा, असे मत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी व्यक्त केले.नाईकवाडे म्हणाले, मंदिरात दि. ९ ते ११ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या दक्षिणायन किरणोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर समिती आणि विवेकानंद महाविद्यालयाच्या खगोलशास्त्र विभागातर्फे दि. ७ व ८ तसेच दि. १२ आणि १३ रोजी सूर्यकिरणांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये दि. ७ आणि १३ रोजी सूर्यकिरणे प्रखरतेने मूर्तीच्या मुखापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.बुधवारी सायंकाळी ५:४८ पर्यंत सूर्यकिरणांनी अंबाबाईच्या मुखकमलांवर सोनेरी अभिषेक केला. यावरून पूर्वीच्या काळी हा सोहळा नक्कीच सात दिवसांचा होत असणार. मात्र काळानुसार सूर्यकिरणांच्या मार्गात मानवी अडथळे निर्माण झाले असावेत. त्यामुळे सूर्यकिरणे थेटपणे मूर्तीवर पोहोचण्यास अडचण येत असावी. परिणामी सोहळा तीन दिवसांचा झाला.
Kirnotsav: सूर्यकिरणे अंबाबाईच्या मुखकमलावर, किरणोत्सव सात दिवसांचा असण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 1:40 PM