कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये हमालांच्या कामबंद आंदोलनाने सलग दुसऱ्या दिवशी कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, हमाल व व्यापारी दोघेही आपआपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने चर्चा निष्फळ ठरली. आज, गुरुवारी सकाळी अकरा वाजता निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांच्याकडे बैठक होणार आहे.गूळ मार्केटमध्ये हमालांनी हमालीवाढीसाठी कामबंद केले आहे. गेली दोन दिवस बैठकांवर बैठका सुरू आहेत. मात्र, हमाल, व्यापारी व शेतकरी आपआपल्या भूमिकेवर ठाम असल्याने गुंता वाढला आहे. बुधवारी जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. आताच्या हमाल वाढीमध्ये ५० टक्के वाढ करण्याची मागणी हमालांनी कायम ठेवली. यावर, इतर बाजार समित्यांच्या तुलनेत अगोदरच दर जास्त असल्याने, एक पैशाही दर वाढवून देणार नसल्याचे व्यापारी, अडते व शेतकऱ्यांनी सांगितले.यावेळी बाजार समितीचे प्रशासकीय मंडळाचे सदस्य युसूफ शेख, व्यापारी नीलेश पटेल, अतुल शहा, शेतकरी विशाल पाटील, अमित केंबळे, हमालाचे प्रतिनिधी बाबूराव खोत, विष्णू रेडेकर, राजाराम जगताप, मारुती पौंडकर, सुभाष यादव आदी उपस्थित होते.आम्हाला हमालच नको...एक तर गुळाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल आहे. त्यातच हमालीत दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव पाहून बुधवारी शेतकरी चांगलेच संतापले. आम्हाला हमालच नको, आमचे गुळाचे बॉक्स आम्ही उतरतो, अशी आक्रमक भूमिका घेतली....तर रव्याला पावणेदहा रुपये हमालीव्यापाऱ्यांकडील हमालांना एका रव्यासाठी (३० किलो) साडेसहा रुपये हमाली मिळते. त्यात ५० टक्के वाढ केली, तर पावणेदहा रुपये हमाली होणार आहे. अडत्यांकडील हमालांना एका रव्यासाठी साडेतीन रुपये हमाली मिळते. त्यात वाढ केली, तर सव्वापाच रुपये शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर दर आहे.
कधी झाला हमालीचा करार :व्यापाऱ्यांकडील हमाल : १ ऑक्टोबर, २०२१अडत्यांकडील हमाल : १ एप्रिल, २०२१