राजाराम लोंढेकोल्हापूर : गेली २५ वर्षांत ‘कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या जाहीरनाम्यातील प्रश्न जशाच्या तसेच आहेत. ‘पंचगंगा प्रदूषण’, ‘रेल्वे विस्तारीकरणासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न दाखवून उमेदवार विजयी झाले, पण प्रश्न आहे तसेच आहेत. मग हे अपयश कोणाचे? विकासाचे तेच तेच मुद्दे ऐकून मतदारांनाच आता उबग आली आहे. बिगर राजकीय नागरी समस्या संघटनांच्या माध्यमातून पाच वर्षांचे ऑडिट होऊन मतपेटीतून दबाव निर्माण केल्याशिवाय जाहीरनाम्यावरील प्रश्न बदलणार नाहीत, हे निश्चित आहे.
लोकशाहीमध्ये विकासाच्या मुद्यावर निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत, असे संकेत आहेत. पण, दुर्दैवाने अलीकडील दहा-पंधरा वर्षांत स्थानिक विकासापेक्षा भावनिक मुद्यावर निवडणुका जिंकल्या जात आहेत. त्यामुळेच २०-२५ वर्षे प्रश्न जटील बनले आहेत. लोकसभेच्या मागील पाच निवडणुकांतील सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे जाहीरनामे पाहिले तर प्रत्येक निवडणुकीत तेच मुद्दे दिसतात. पंचगंगा प्रदूषण, कोल्हापूर ते कोकण रेल्वे, विमानतळाचे विस्तारीकरण, कोल्हापूरचा ‘आयटी पार्क’, इचलकरंजीचा पाणीप्रश्न, यंत्रमागधारकांचे प्रश्न हेच मुद्दे प्रचारात रेटले जातात.निवडणूकीनंतर मात्र या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी किती प्रामाणिक प्रयत्न केले जातात, हा संशोधनाचा प्रश्न आहे. निवडणुका जवळ आल्या की संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे मागणीचे पत्र द्यायचे आणि त्याची प्रसिद्ध करायची या पलीकडे दुर्दैवाने काहीच होताना दिसत नाही. कोल्हापूरच्या विमानतळाचा प्रश्न मार्गी लागला पण इतर प्रश्नांचे काय? पारंपरिक मुद्दे उद्या उमेदवारांच्या जाहीरनाम्यात दिसणार आहेत, त्याचा जाब मतदारांनी विचारण्याची गरज आहे.
सर्वांगीण विकास म्हणजे काय रे भाऊ?गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्वच निवडणुकीत उमेदवारांच्या तोंडात सर्वांगीण विकास हाच शब्द असतो. मात्र, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही ‘सर्वांगीण विकास’ या शब्दाचा अर्थ सामान्य माणसाला समजलेला नाही. मतासाठी दारात येणाऱ्या उमेदवारालाच या शब्दाचा अर्थ विचारण्याचे धारिष्ट मतदारांना दाखवावे लागणार आहे.
राजकीय इच्छाशक्तीचा अभावलोकसभेच्या मागील चार निवडणुका विकासापेक्षा भावनिकतेवर लढल्या गेल्या. कधी कोल्हापूरची अस्मिता, जातीचे समीकरण तर कधी ‘आमचं ठरलयं’ यावर निवडणुका झाल्या. येथे विकासापेक्षा व्यक्तिगत शह काटशहाभोवतीच निवडणूक फिरते. जोपर्यंत विकासावर निवडणुका होणार नाहीत तोपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील प्रश्न सुटणार नाहीत.
हे प्रश्न किती वर्षे भिजत पडणार?
- पंचगंगा प्रदूषण
- अद्ययावत आयटी पार्क
- अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा
- कोल्हापूर-कोकण रेल्वे
- शाहू मिलच्या ठिकाणी भव्य शाहू स्मारक
- कोल्हापूर खंडपीठ
- इचलकरंजी पाणीप्रश्न
- अडचणीतील यंत्रमागधारकांना मदत
विकासकामांत आर्थिक अडचणी असल्या तरी त्याला सोडवण्यासाठी जनमाणसांचा दबाव नेत्यांवर राहिला पाहिजे. जोपर्यंत चळवळीद्वारे मतपेटीतून दबाव निर्माण करू शकत नाही, तोपर्यंत प्रश्न भिजतच राहणार. - डॉ. अशोक चौसाळकर (राजकीय अभ्यासक)