कोल्हापूर : आज कधी नव्हे ते शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. देशासमोरच्या मूलभूत प्रश्नांना बगल देऊन एक वेगळेच वातावरण निर्माण केले जात आहे. आमच्यासाठी सर्वसामान्यांचे हित महत्त्वाचे असून या हिताला प्राधान्य देणाऱ्या विचारधारेसोबत राहण्यासाठी लोकसभा निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे शाहू छत्रपती यांनी सांगितले.शाहू छत्रपती यांनी मंगळवारी ‘लोकमत’ शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संपादक डॉ. वसंत भोसले, सहायक उपाध्यक्ष मकरंद देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, उद्धव सेनेचे नेते विजय देवणे, माणिक मंडलिक, माजी सभापती प्रदीप झांबरे, प्राचार्य महादेव नरके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
शाहू छत्रपती म्हणाले, लोकसभा मतदारसंघातील सर्वच तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शाहू विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांपासून ते तालमी, संस्था, मंडळे आपुलकीने येऊन पाठिंबा व्यक्त करत आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थान हे सर्वच बाबतीत एक आदर्श संस्थान म्हणून विकसित केले आणि भारतभरात एक वेगळा ठसा उमटवला. त्याविषयीची कृतज्ञतेची भावना सर्व जनतेमध्ये दिसून येत आहे. त्यामुळेच ज्या ज्या ठिकाणी आम्ही जात आहोत त्या ठिकाणी उत्स्फूर्त स्वागत होत आहे. याच शिदोरीवर आपण यशस्वी होऊ आणि कोल्हापूर विकासाचे नवे मानदंड निर्माण करू.
विजय दर्डा, राजेंद्र दर्डा यांच्याशी चर्चायावेळी शाहू छत्रपती यांनी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा आणि एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधून चर्चा केली. ‘लोकमत’ आणि आपले नाते हे जुने असून त्याच प्रेमापोटी आपण रिंगणात उतरल्यानंतर भेटण्यासाठी आल्याचे शाहू छत्रपती यांनी सांगितले.