कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री दादा भुसे हे मध्यरात्री कोल्हापूरला दाखल झाले होते. विशाळगडावरील प्रकाराची त्यांनी विमानतळावरच माहिती घेऊन जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली.आषाढीच्या पार्श्वभूमीवर शिंदे रविवारी पंढरपूरला आले होते. दरम्यान, त्यांनी रात्री विमान कोल्हापूरला मागवून घेऊन इकडे येण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर विमानतळावर ते २० मिनिटे होते. दरम्यान, विशाळगड परिसरातील सर्व प्रकार त्यांना आधीच समजला होता. त्यांनी विमानतळावरच येडगे आणि फुलारी यांच्याशी चर्चा केली. विशाळगडावरील अतिक्रमणाचे नेमके प्रकरण, न्यायालयाचे आदेश आणि त्याठिकाणी रविवारी दिवसभर झालेली दगडफेक, तोडफोड याचीही त्यांनी माहिती घेतली आणि या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या.दरम्यान, विमातळावरच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी वैद्यकीय मदतीसाठीचे पत्र सादर केले. त्याही गडबडीत त्यांनी स्वाक्षरी करत जादा निधीच्या प्रस्तावाला मान्यता दिली. यावेळी युवा सेनेचे सचिव किरण साळी, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे समन्वयक विनायक जरांडे, वीरेंद्र मंडलिक, कागल तालुकाप्रमुख नेताजी बुवा उपस्थित होते.
मध्यरात्री मुख्यमंत्री शिंदे कोल्हापुरात, विशाळगडाबाबत घेतली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 12:35 PM