राजाराम लोंढेकोल्हापूर : विधानसभेच्या मागील निवडणुकीत अपक्षांनी ‘चंदगड’सह पाच मतदारसंघांत दिग्गजांचे विजयाचे गणित बिघडवले होते. त्याचा धसका या निवडणुकीत घेतला असून बंडोबांना थंड करण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाली आहे. माघारीसाठी ४ नोव्हेंबरची मुदत असली तरी विविध मार्गाने त्यांची मनधरणी सुरू केली आहे.‘चंदगड’मध्ये राजेश पाटील हे ४३८५ मताधिक्याने विजयी झाले, पण अपक्ष शिवाजी पाटील यांनी दुसऱ्या क्रमाकांची मते तर रमेश रेडेकर यांनी १० हजार मते घेतली. त्यांनी शिवसेनेचे संग्राम कुपेकर व जनसुराज्य पक्षाचे अशोक चराटी यांचे गणित बिघडवले.‘राधानगरी’मध्ये प्रकाश आबीटकर हे १८ हजार ४३० इतक्या मताधिक्याने दुसऱ्यांदा विधानसभेत पोहोचले. येथे अरुण डोंगळे, राहुल देसाई, चंद्रकांत पाटील, जीवन पाटील, सत्यजीत जाधव या तुल्यबळ अपक्षांनी ४४ हजार ८२६ मते घेतली.‘कागल’मध्ये राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ तर शिवसेनेकडून संजय घाटगे रिंगणात होते. येथे समरजीत घाटगे यांनी अपक्ष उभे राहून दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली.‘हातकणंगले’ येथे राजू आवळे हे ६७७० च्या मताधिक्याने पहिल्यांदाच विधिमंडळात गेले. पण, येथे १७ पैकी ९ अपक्ष रिंगणात होते. या सगळ्यांना तब्बल १३ हजार मते मिळाली.
‘नोटा’च राहिला तिसऱ्या क्रमांकावरमागील निवडणुकीत दहा विधानसभा मतदारसंघांच्या तुलनेत ‘कोल्हापूर उत्तर’मध्ये तब्बल ३०३९ मते ‘नोटा’ला मिळाली. विशेष म्हणजे राजकीय पक्षांसह अपक्ष असे ९ जण रिंगणात होते, मात्र ‘नोटा’च तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
‘इचलकरंजी’, ‘शिरोळा’त अपक्षांचीच बाजीइचलकरंजीत मागील निवडणुकीत पंधरा पैकी तब्बल ८ उमेदवार अपक्ष रिंगणात होते. त्यापैकी प्रकाश आवाडे यांनी भाजप, काॅंग्रेससह इतर पक्षांच्या उमेदवारांना चितपट केले. ‘शिरोळ’मध्ये राजेंद्र पाटील-यड्रावकर हे अपक्ष म्हणून सामोरे गेले आणि २७ हजार ८२४ चे मताधिक्य घेऊन शिवसेनेचे उल्हास पाटील, ‘स्वाभिमानी’चे सावकार मादनाईक यांचा पराभव केला.
मतदारसंघनिहाय अपक्षांनी घेतलेली मते..मतदारसंघ - अपक्ष - मते
- चंदगड - ९ - ७३,०२५
- राधानगरी - ७ - ४४,९७४
- कागल - २ - ८९,१२८
- कोल्हापूर दक्षिण - ३ - ८९८
- करवीर - १ - ३६७
- कोल्हापूर उत्तर - ३ - १,७८२
- शाहूवाडी - ५ - ३,२०४
- हातकणंगले - ९ - १३,०४९
- इचलकरंजी - ८ - १,१९,१०६
- शिरोळ - ४ - ९३,८८९