राजाराम लोंढे, कोल्हापूर: साखर कारखानदार व सरकार ऊस उत्पादक शेतकरी विरोधी भुमिका घेत आहेत. मागील हप्ता देणे शक्य नाही असे कारखान्याचे मत आहे. यामुळे आंदोलन थांबवून कारखाने सुरू करावे. मागच देता येणार नाही व पुढचे किती द्यायचे हे सांगता येणार नाही. अशी भूमिका जर सहकारमंत्री घेत असतील तर सरकार, कारखानदार व विरोधी पक्ष असे सर्वजण मिळून या कटात सामिल झाले असल्याने उद्याचा राष्ट्रीय महामार्गाचा चक्का जाम आंदोलन होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली.
मुंबई येथे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी शेतकरी संघटना व कारखानदार प्रतिनिधी यांची गतवर्षीच्या ४०० रूपये दुसरा हप्ता व चालू गळीत हंगामात ३५०० रूपये पहिला हप्ता द्या या मागणीसाठी बैठक पार पडली. त्यानंतर शेट्टी बोलत होते. राजू शेट्टी म्हणाले, सहकारी कारखाने ना नफा ना तोटा या तत्वावर चालतात. एफ. आर. पी पेक्षा जादा रक्कम देवू नये असा कोणताही कायदा नाही. शासन व कारखानदार यांनी व्यावहारीक पातळीवर तोडगा काढावा. अडचणीच्या काळामध्ये शेतक-यांनी कारखान्यांना मदत केली आहे. यामुळे साखर कारखान्यांनी एक पाऊल पुढे येत जादा दर दिल्यास सीमाभागातील ऊस शेतक-यांना पुरविण्यासाठी आवाहन करतो. राज्यातील कारखान्यांचे चेअरमन आमदार खासदार आहेत या लोकांनी धोरणात बदल करण्यासाठी केंद्राकडे काय पाठपुरावा केला. सगळ्या गोष्टी शेतक-यांनी केला तर मग आमदार खासदार कशासाठी आहेत.
या बैठकीत कारखानदारांच्या वतीने भुमिका मांडताना आमदार प्रकाश आवाडे म्हणाले कि संघटनांनी एक रक्कमी एफ. आर. पी. ची भुमिका सोडून मागील हप्ता का मागत आहेत. साखर कारखान्यांनी आर. एस. एफ सुत्रानुसार दर दिला आहे. राजू शेट्टींची मागणी कायद्याच्या बाहेरची असून जादा आलेले पैसे कर्जाला भरलेले आहेत. यामुळे कारखान्यांकडे पैसे शिल्लक नाहीत. गुरूदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे म्हणाले की केंद्र सरकारचे कायदे चुकीचे आहेत. शेतकरी व कारखानदार यांनी मिळून दिल्लीवर हल्ला करायला पाहिजे. साखरेचा दर ३८०० करा. इथेनॅाल १० रूपयांनी वाढल्यास शेतक-यांना जागा दर देणे शक्य आहे. या बैठकीस स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, जनार्दन पाटील, महेश खराडे, संदीप राजोबा, आंदोलन अंकुशचे पुंडलिक पाटील, सहकार सचिव राजेश प्रधान, साखर आयुक्त चंद्रकांत पुलकंडवार यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.